Maharashtra Budget Session | राज्यात उद्यापासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची राजकीय घडामोड समोर आली आहे. या अधिवेशनात लव्ह जिहादविरोधी कायदा मंजूर करण्याच्या दृष्टीने महायुती सरकारकडून हालचाली सुरू असल्याची माहिती मिळत आहे. हिंदू संघटनांच्या मागण्यांमुळे या विषयाला नव्याने वेग आला आहे. (Maharashtra Budget Session News)
महायुती सरकारची हालचाल वेगात :
सोमवारपासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होत असून त्याच सत्रात लव्ह जिहादविरोधी कायद्याबाबत प्रस्ताव पुढे येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या संदर्भात महायुती सरकारने प्राथमिक पातळीवर चर्चा सुरू केल्याचे समजते. हिंदुत्ववादी संघटनांनी अधिवेशनातच असा कायदा करावा, अशी मागणी लावून धरल्याने सरकारनेही या विषयावर गांभीर्याने विचार सुरू केल्याची माहिती आहे. (Maharashtra Budget Session)
कायद्याची रूपरेषा ठरवण्यासाठी लवकरच कायदे तज्ज्ञांची बैठक बोलावली जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. गुजरातमध्ये आधीच असा कायदा अस्तित्वात आल्यानंतर आता महाराष्ट्रातही तत्सम पाऊल उचलले जाईल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अधिवेशनादरम्यान या विषयावर अधिकृत घोषणा होते का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Maharashtra Budget Session | विरोधकांचा बहिष्कार आणि टीका :
दरम्यान, अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला महाविकास आघाडीने पत्रकार परिषद घेत सरकारवर जोरदार टीका केली. या परिषदेत शिवसेना शिंदे गट (Shiv Sena Shinde Faction) आणि काँग्रेस (Congress) नेत्यांची उपस्थिती होती. विरोधकांनी पारंपरिक चहापान कार्यक्रमावर बहिष्कार टाकत आपली नाराजी व्यक्त केली.
यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी सरकारवर तीव्र शब्दांत हल्लाबोल केला. मुलुंडमधील मेट्रो मार्गिकेच्या कामादरम्यान झालेल्या अपघाताचा उल्लेख करत त्यांनी प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच राज्यातील कोणताही जिल्हा खऱ्या अर्थाने सुजलाम सुफलाम असल्याचे दाखवून द्यावे, असे आव्हान त्यांनी दिले. शेतकऱ्यांना योग्य भाव मिळत नाही, पिकविमा लाभ पोहोचत नाही आणि शहरांमध्ये तरुणांना रोजगार उपलब्ध नाही, अशा मुद्द्यांवरून त्यांनी सरकारला लक्ष्य केले.
याआधी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये विरोधकांना मोठा पराभव पत्करावा लागला होता. नगरपंचायत, नगरपरिषद तसेच महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांत भाजप (Bharatiya Janata Party) सर्वात मोठा पक्ष ठरला, तर महायुतीला मोठे यश मिळाले. या पार्श्वभूमीवर आता सुरू होणाऱ्या अधिवेशनात विरोधक कोणते मुद्दे मांडतात आणि सरकारला कोंडीत पकडतात का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.






