लक्ष्मण हाकेंचा थेट अजित पवारांवर हल्ला! ‘जरांगेंच्या आंदोलनामागे अजितदादा’; खळबळजनक दावा

On: August 29, 2025 1:50 PM
Laxman Hake
---Advertisement---

Laxman Hake | मराठा आरक्षणासाठी आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. लाखोंच्या संख्येने मराठा बांधव मुंबईत दाखल झाले असताना आता या आंदोलनावर ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी खळबळजनक दावा केला आहे. “हा लढा आरक्षणासाठी नसून सरकार उलथून टाकण्याचा राजकीय कट आहे,” असा आरोप करत त्यांनी थेट अजित पवार गटालाही या कटात सहभागी असल्याचं म्हटलं आहे.

सरकार उलथवण्याचा राजकीय कट? :

पत्रकार परिषदेत बोलताना लक्ष्मण हाके (Laxman Hake) म्हणाले की, “आतापर्यंत मी फक्त विरोधी पक्ष सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहेत असं म्हणत होतो. पण आता मी जबाबदारीने सांगतो की अजित पवारांचे आमदार आणि खासदार देखील या कटात सामील आहेत. जरांगे नावाच्या चेहऱ्यामागून आमदार-खासदार सरकारला अस्वस्थ करण्याचा प्रयत्न करत आहेत. हा लढा आरक्षणाचा नाही.”

हाके पुढे म्हणाले की, जर जरांगेंच्या मागण्या पूर्ण झाल्या तर राज्यातील ओबीसी समाजाचं आरक्षण धोक्यात येईल. “महाराष्ट्रात लोकशाही कोमात असून झुंडशाही वाढत आहे. जरांगे न्यायालयाचे आदेश मानायला तयार नाहीत, मग ते हुकूमशाहा आहेत का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

Laxman Hake | ‘स्क्रिप्ट फोडली होती’ असा दावा :

“मनोज जरांगे मुंबईकडे निघताना स्वतः म्हणाले होते की मी सरकार उलथून लावणार आहे. त्यांनीच ती स्क्रिप्ट फोडली. मग हा लढा आरक्षणासाठी नाही हे स्पष्ट आहे,” असं हाके म्हणाले. त्यांनी भावनिक होत “मी चुकीचा असेल तर मला आतमध्ये टाका. मी आत्महत्या करू का म्हणजे प्रश्न सुटतील का?” असेही विधान केले.

हाके यांनी अजित पवारांवरही (Ajit Pawar) निशाणा साधत म्हटलं की, “अजित पवारांचे आमदार जरांगे यांच्या आंदोलनाला रसद पुरवत आहेत. अजित पवार हे मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहेत.” तसेच ओबीसी मंत्र्यांनी मुख्यमंत्री भेटून भूमिका स्पष्ट करावी, अन्यथा ओबीसी समाज त्यांना माफ करणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

पुढील रणनीती पुण्यात :

दरम्यान, हाके यांनी सांगितलं की, “उद्यापासून पुण्यात आमची बैठक होणार आहे. त्यानंतर आंदोलनाची दिशा निश्चित केली जाईल. ओबीसी जोडो अभियान सुरू करणार असून या लढ्यात ओबीसी समाज एकत्र येईल.” त्यांच्या या विधानामुळे मराठा आरक्षणाच्या आंदोलनावर नवा वादळ उठलं आहे.

News Title: Laxman Hake’s Big Claim: Manoj Jarange’s Protest a Political Script, Ajit Pawar’s Group Involved in Destabilizing Govt

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now