Laxman Hake | बारामतीत आज झालेल्या ओबीसी मोर्चादरम्यान ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) आक्रमक झाले. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर थेट निशाणा साधत जोरदार टीका केली. मराठा आरक्षणाचा मुद्दा हाताळताना शरद पवार यांनी मनोज जरांगे पाटील यांना उभं केलं असून, “जरांगे नावाचं भूत महाराष्ट्राच्या मानगुटीवर बसवलं आहे” अशी टिप्पणी हाकेंनी केली.
प्रकाश आंबेडकरांचा फोन भर मंचावर :
हाकेंच्या भाषणादरम्यान एक नाट्यमय प्रसंग घडला. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी त्यांना फोन केला. हाके यांनी तो कॉल स्पीकरवर घेताच आंबेडकरांनी थेट उपस्थित जनतेशी संवाद साधला. “जबरदस्ती दिलेलं आरक्षण आपल्याला मान्य नाही; त्याविरोधात रस्त्यावर उतरावं लागेल” असे आंबेडकर म्हणाले.
Laxman Hake | “मंडल आयोग शरद पवारांनी लागू केला असं म्हटलं तर कानफाड फोडा” :
हाकेंनी आपल्या भाषणात शरद पवार आणि अजित पवार (Ajit pawar) या दोघांवर हल्लाबोल केला. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, मंडल आयोग देशभर लागू झाला होता, महाराष्ट्रात नाही. त्याला श्रेय शरद पवारांना दिलं जातं, हे चुकीचं आहे. “कोणी असं म्हटलं तर त्याचं कानफाड फोडा” असे हाके म्हणाले. मंडल आयोग लागू करण्यासाठी दि बा पाटील, बबनराव ढाकणे, शिवाजीभाऊ शेंडगे, गोपीनाथ मुंडे, छगन भुजबळ, अरुण कांबळे, बाळासाहेब आंबेडकर यांची भूमिका महत्त्वाची होती, असेही त्यांनी ठासून सांगितले.
हाके म्हणाले की, शरद पवार हे कुटुंबाच्या बाहेर कारखाने, आमदारकी, खासदारकी जाऊ देत नाहीत. “रयत शिक्षण संस्था असो वा वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, सर्वत्र शरद पवारांनीच अध्यक्षपद घेतलं”. इतकंच नाही तर महाराष्ट्रातील जवळपास 400 संस्थांचे अध्यक्ष शरद पवार असल्याची टीका त्यांनी केली.
अजित पवारांवरही टीका :
अजित पवार यांच्यावरही हाकेंनी हल्लाबोल केला. “कॅनलच्या कंपाऊंडवर गोधडी वाळत घातली तर बघा, कंपाऊंड तुझ्या बापाचं आहे का?” असा सवाल करत त्यांनी पवार कुटुंबीयांचा सत्तेतील दबदबा उघडकीस आणला. “सत्तेतून पैसा, पैशातून पुन्हा कारखाना” असा आरोप त्यांनी करत, सामान्य कष्टकऱ्यांचे पैसे यामध्ये गुंतवले जातात, असा दावा केला.
हाके म्हणाले की, पूर्वी ओबीसी विरुद्ध ओबीसी अशी लढत होत होती. मात्र, आरक्षणाचा प्रश्न डळमळीत झाला तर “आता ओबीसी विरुद्ध डुप्लीकेट ओबीसी अशी लढत होणार आहे”. इतकंच नव्हे तर पुढील निवडणुकांमध्ये “डुप्लीकेट ओबीसी विरुद्ध डुप्लीकेट ओबीसी” अशीच टक्कर होईल, अशी टीका त्यांनी केली.






