Laxman Hake Statement | ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण्यांवर जोरदार टीका केली आहे. हैदराबाद गॅझेटच्या संदर्भाने बोलताना त्यांनी स्पष्ट इशारा दिला की, “महाराष्ट्रात ॲक्शनला नक्कीच रिएक्शन मिळेल आणि ही रिएक्शन लोकशाही मार्गाने असेल.” (Laxman Hake Statement)
ओबीसी उठला तर नेतेपद धोक्यात :
हाकेंनी आंदोलकांना आश्वस्त करत सांगितले की ते लोकशाही पद्धतीने मोर्चे काढून आंदोलन करतील. “आम्ही महाराष्ट्रातल्या ओबीसीचा आवाज बुलंद करू. जर ओबीसी जागा झाला तर अनेक आमदार, खासदार, अर्थमंत्री, कारखानदार आणि नेत्यांना त्यांच्या खुर्च्या टिकवणं कठीण होईल,” असा दावा त्यांनी केला. तसेच २०२९ पर्यंत महाराष्ट्रात फुले-शाहू-आंबेडकर विचारांचा खरा प्रभाव दिसेल, असेही ते म्हणाले.
यावेळी हाकेंनी मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्यावर थेट टीका केली. “जरांगे हा फाळकुट माणूस आहे, चावडीवर बसणारा माणूस आहे,” अशा शब्दांत त्यांनी त्यांच्यावर हल्ला चढवला. स्वतःवर सात-आठ वेळा हल्ले झाल्याचा उल्लेख करत त्यांनी गृह विभागाने याची चौकशी करावी, अशी मागणीही केली.
Laxman Hake Statement | “बोगस प्रमाणपत्रांचं वाटप सुरू” :
हाकेंनी गंभीर आरोप करत सांगितले की, आतापर्यंत लाखो बोगस प्रमाणपत्रांचं वाटप झालं आहे. “शासनच बेजबाबदार असेल, तर न्याय कुणाकडे मागायचा?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. “मराठा समाज एवढा अशिक्षित आहे का की वंशावळ शोधू शकत नाही? मराठा समाजात मुख्यमंत्री आहेत, पण ओबीसीचेही मुख्यमंत्री आहेत. मुख्यमंत्री हे १४ कोटी जनतेचे आहेत, म्हणून जबाबदारीने वागा,” असेही हाकेंनी स्पष्ट केले.
हाकेंनी यावेळी राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrushan Vikhe Patil) यांच्यावरही जोरदार टीका केली. “ते कारखानदारीचे नेते आहेत. सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्या त्यांच्या पाच पिढ्या राजकारणात आहेत. निवडणुका जिंकणे आणि कारखानदारी चालवणे एवढंच त्यांच्या नावे आहे. मुळात त्यांना मुख्यमंत्री व्हायचं स्वप्न आहे, पण कारखानदारीच्या जोरावर मुख्यमंत्री होता येत नाही,” असे त्यांनी म्हटले.
त्यांनी पुढे दावा केला की, “आता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ओबीसी आणि दिनदलित समाज ठरवेल.”






