Laxman Hake | मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून राज्यात पुन्हा राजकीय तापमान वाढलं आहे. मुंबई उच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला. “एका जातीला अनेक प्रकारचे आरक्षण देता येत नाही. सातारा आणि औंध गॅझेट लागू केल्यास सरकार तोंडघशी पडेल. न्यायालय त्यांना योग्य ती जागा दाखवेल,” असे हाके यांनी स्पष्ट शब्दांत म्हटलं. (OBC Reservation)
“कुणबीकरणाद्वारे ओबीसींवर अन्याय” :
हाके म्हणाले, “सरकारने सरसकट कुणबी प्रमाणपत्र काढण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच कुणबीकरणाद्वारे ओबीसींचे आरक्षण संपवले जात आहे. ओबीसींना मिळालेलं हक्काचं आरक्षण या सरकारने धोक्यात आणलं आहे. मराठ्यांचा मागासलेपणा न्यायालय आणि आयोगाने वेळोवेळी नाकारला आहे. पण मंत्र्यांनी, मुख्यमंत्र्यांनी राजकीय स्वार्थासाठी ओबीसींच्या हक्कावर गदा आणण्याचा डाव आखला आहे.”
त्यांनी पुढे इशारा दिला की, यापुढे ओबीसी मतदार वेगळा विचार करून मतदान करतील. “सरकारच्या या खेळीचा फटका महायुतीला बसणार आहे,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
जरांगेवर एकही गुन्हा नाही – हाकेंची टीका :
लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे (Manoj jarange) यांच्यावर थेट नाव न घेता टीका केली. ते म्हणाले, “जरांगे यांनी बीड शहर पेटवलं, मुंबई वेठीस धरली, मुख्यमंत्र्यांची आई-माई काढली. त्यावेळी वातावरण दूषित नव्हतं का? मात्र त्यांच्यावर एकही गुन्हा दाखल नाही. पण आम्ही मोर्चा काढतो तेव्हा आमच्यावर गुन्हे दाखल होतात. हा सरळसरळ सामाजिक दुजाभाव आहे.”
त्यांनी संतप्त शब्दात सांगितलं की, ओबीसींना गप्प बसवून एकतर्फी भूमिका मांडली जाते. “आमच्यावर दडपशाही होते, आणि आम्ही बोललो तर वातावरण दूषित झालं असं म्हटलं जातं. हे आम्हाला मान्य नाही,” असं त्यांनी ठणकावून सांगितलं.
“दसरा झाल्यानंतर संघर्ष यात्रा” :
लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी पुढे जाहीर केलं की, दसऱ्यानंतर ओबीसींची संघर्ष यात्रा सुरू होणार आहे. “या यात्रेचा समारोप मुंबईत होईल. त्या वेळी आम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी जाऊ. या यात्रेतून सरकारला आमची ताकद दाखवू,” असं त्यांनी सांगितलं.
याचबरोबर त्यांनी खासदार सोनवणे, आमदार पंडित आणि आमदार सोळंके यांच्यावरही टीका केली. “या तिघांनीही कधीच ओबीसी आरक्षणाबद्दल भूमिका मांडली नाही. त्यांनी राजीनामा देऊन जरांगेना पाठिंबा द्यावा. पण आम्ही एकजूटीने लढा देणार असून, ओबीसी आंदोलनात फूट पाडण्याचा प्रयत्न यशस्वी होणार नाही,” असं त्यांनी ठामपणे सांगितलं.






