Laxman Hake | मराठा आरक्षणासंदर्भात सरकारने काढलेल्या निर्णयामुळे ओबीसी समाजात नाराजी वाढली आहे. मंत्री छगन भुजबळ (Chhagan bhujbal) यांनी आपला विरोध आधीच व्यक्त केला होता. आता ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी थेट बारामतीत आंदोलन करण्याचा निर्णय घेतला असून, त्यांनी स्पष्ट शब्दांत म्हटले की, “अटक करा, तुरुंगात टाका, पण बारामतीत मोर्चा काढणारच.”
बारामतीवर आंदोलन का? :
मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांच्या मुंबईतील आंदोलनाला बारामतीतून रसद पुरवली गेल्याचा आरोप करत हाके यांनी आपला मोर्चा बारामतीकडे वळवला आहे. त्यांचे म्हणणे आहे की, “आम्ही मराठा आरक्षणाला विरोध करत नाही, पण सरकारने काढलेला आताचा जीआर फक्त ओबीसीच नव्हे तर एसी आणि एसटींचेही आरक्षण संपवणारा आहे. घराणेशाही आणि सत्ताधारी वर्गाने पैसा आणि सत्ता यांचे चक्र तयार केले आहे. आम्ही त्याविरोधात बोलतोय.” (Laxman Hake on OBC March in Baramati)
हाके यांनी आपल्या भाषणात छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख करत सांगितले की, “आरक्षण गेलं तर गावगाड्यातील बलुतेदार काय करणार? महाराष्ट्र १८ पगड जातींचा आहे. बारामतीत आम्ही मोर्चा काढणारच, उशीर झालाय, पण रॅलीनेच जाणार.”
त्यांनी खासदार सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्यावरही टीका केली. “आम्ही तुम्हाला मत दिलं नाही का? मग आमच्या न्याय हक्काकडे का दुर्लक्ष करता?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
Laxman Hake | पोलिसांनी दिली परवानगी नाकार :
बारामती पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली आहे. गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर आंदोलन पुढे ढकला, अशी विनंती पोलिसांनी केली होती.
मात्र आंदोलकांनी आजच मोर्चा काढण्याचा निर्धार व्यक्त केल्याने पोलिसांनी कडक भूमिका घेतली आहे. तरीही हाके यांनी ठामपणे सांगितले की, “अटक झाली तरी आम्ही बारामतीत जाणार.”






