Laxman Hake | ओबीसी (OBC) नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांच्या कारवर अहिल्यानगरमध्ये (Ahilyanagar) अज्ञात तरुणांनी हल्ला केला आहे. अरणगावजवळील रस्त्यावर ही घटना घडली. हाके नाश्ता करून पुढे आयोजित असलेल्या ओबीसी मेळाव्यासाठी जात असताना 10–12 अज्ञात व्यक्तींनी लाठ्या-काठ्यांनी त्यांच्या गाडीच्या काचा फोडल्या. पोलिस सुरक्षा असतानाही हा हल्ला झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. लक्ष्मण हाके यांनी आज अहिल्यानगरमध्ये सभा आयोजित केली होती. त्या सभेकडे जातानाच ही घटना घडली.
हल्ल्यानंतर लक्ष्मण हाके काय म्हणाले :
“आम्ही दौंड मार्गे आहिल्यानगर बायपासवरुन येत असताना सारंगी हॉटेलसमोर 10 ते 12 लोकांनी आमच्या गाडीवर हल्ला केला आहे. आमच्यासोबत पोलीस असतानाही त्यांनी मोठे बांबू आणि लाठ्या काठ्या आणल्या होत्या. आमच्या दोन्ही गाड्यांवर त्यांनी बेछुट हल्ला केला आहे. माझ्यावर नऊ वेळा हल्ले झाले आहेत. महाराष्ट्र शासनाला याची कोणतीही फिकिर नाही. आम्ही ओबीसी आरक्षण वाचवा म्हणतोय हा आमचा गुन्हा आहे का ?”, अशी संतापजनक प्रतिक्रिया लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी दिली.
दरम्यान मागच्या २ ते ३ वर्षांपासून राज्यात ओबीसी आणि मराठा (Maratha) यांमध्ये संघर्ष पाहायला मिळत आहे. लक्ष्मण हाके यांचे सहकारी नवनाथ वाघमारे (Navnath Waghmare) यांची गाडीही काही दिवसांपूर्वी जाळण्यात आली होती. तसेच लक्ष्मण हाके यांच्या मुलावरतीही काही दिवसांपूर्वी हल्ला झाला होता.
हाके यांनी आज (27 सप्टेंबर) अहिल्यानगरमध्ये सभेचे आयोजन केले होते. मात्र, सभास्थळी पोहोचण्याआधीच हा प्रकार घडला. या घटनेनंतर सभा होणार की नाही, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
लक्ष्मण हाके यांची फेसबुक पोस्ट चर्चेत :
दरम्यान, अहिल्यानगरमधील सभेपूर्वी लक्ष्मण हाके यांनी फेसबुकवर (Facebook) एक पोस्ट केली होती. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं होतं की, ” ओबीसी भटके एकत्र आले पाहिजेत, आपले हक्क अधिकार टिकले पाहिजेत, म्हणून मी प्रामाणिकपणे भांडतोय. मी एक मेंढपाळ धनगराचं पोरगं आहे, मी बॅनर छापू शकत नाही, गाडी ला पैसे देऊ शकत नाही किंवा भले मोठे स्टेज लावू शकत नाही, तसेच कुणाला चहा पाजू शकत नाही, हे माहित असूनही तुम्ही आजपर्यंत मला साथ दिलीत.
उपोषण ,आंदोलन असो की मोर्चे, एल्गार मेळावे असोत किंवा रॅली, तुम्ही ताकदीने माझ्या पाठीशी उभे राहिलात, मला पाठिंबा देत राहिलात. मी तुमचे आभार मानावेत तेवढे कमी आहेत. मी ओबीसीच्या बाजूने बोलत गेलो, भांडत गेलो, ओबीसीच्या छोट्या छोट्या जात समूहाना जोडत गेलो, लाखो माणसं जोडली पण शत्रू ची संख्या सुद्धा वाढत गेली. हल्ले झाले, ते झेलले, पण आत्ता सहन होत नाही.
उद्या दैत्यानांदूर ता. पाथर्डी जि. अहिल्यानगरच्या ओबीसी मेळाव्यानंतर मी माझी भूमिका जाहीर करेन. मी आंदोलनात असेन किंवा नसेनही, पण तुम्ही जेवढी साथ दिलीत त्याबद्दल जाहीर आभार मानतो.”
News title : Laxman Hake Car Accident






