Purandar Airport | पुरंदर विमानतळासाठी जमीन मोजणीच्या प्रक्रियेला शुक्रवारपासून प्रारंभ झाला आहे. पहिल्या दिवशी तालुक्यातील सुमारे ५० हेक्टर जमिनीच्या मोजणीची प्रक्रिया शांततेत पूर्ण झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. तालुक्यातील मुंजवडी, खानवडी, एखतपूर या तीन गावात मोजणी पूर्ण झाली आहे. मोजणी प्रक्रियेदरम्यान ड्रोनचाही वापर केला जाणार आहे.
पुरंदर तालुक्यातील सातही गावांत ही मोजणी होणार असून, पुढील २५ दिवस हि प्रक्रिया चालणार आहे. यासाठी पाच पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. मोजणी करण्यासाठी यापूर्वी एप्रिल महिन्यात जिल्हा प्रशासनाने भूमी अभिलेख विभागाकडे शुल्कही भरले होते. मात्र ड्रोन सर्व्हेला शेतकऱ्यांना घाबरून विरोध केला होता. त्यानंतर जिल्हा प्रशासनाच्या वतीने त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न करण्यात आला. तोपर्यंत सर्व्हेला स्थगिती देण्यात आली होती.
तीन हजार एकर जागा घेण्यावर शिक्कामोर्तब
पुरंदर विमानतळासाठी पूर्वी साडेसात हजार एकर जागा घेण्यात येणार होती. मात्र त्याऐवजी आता ३ हजार एकर जागा घेण्यावर जिल्हा प्रशासनाने शिक्कामोर्तब केला आहे. त्यामुळे प्रशासनाने शेतकऱ्यांचे समुपदेशन करीत त्यांचे विमानतळाच्या प्रकल्पाला जमीन देण्यासाठी मन वळविले आहे. ३२०० शेतकऱ्यांनी २८१० एकर जमीन देण्याची तयारी दाखविल्याने जिल्हा प्रशासनाचे मोठे यश मानले जात आहे.
सुरवातीला शेतकऱ्यांनी केलेल्या विरोधानंतर ड्रोन सर्व्हे, मोजणी प्रक्रियेला स्थगिती दिली होती. त्यानंतर शेतकऱ्यांसोबत संवाद साधून सामोपचाराने जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांनी संमती मिळवली. त्यानंतर हा सर्व्हे पुन्हा सुरु करण्यात आला.
तीन गावांमध्ये भूसंपादन
तालुक्यातील तीन गावांमध्ये भूसंपादन अधिकारी संगीता राजापूर-चौगुले, भूसंपादन समन्वयक डॉ. कल्याण पांढरे आणि पुरंदरच्या उपविभागीय अधिकारी वर्षा लांडगे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी मोजणीची प्रक्रियेला सुरवात झाली. पुरंदर तालुक्यातील मुंजवडी, खानवडी आणि एखतपूर गावांमध्ये मोजणी प्रारंभ झाला आहे. गरजेनुसार ड्रोनचा वापर करण्यात येणार आहे. दिवसभरात शांततेत ५० हेक्टर जागेची मोजणी झाली. पुढे आणखी तीन आठवडे ही मोजणीची प्रक्रिया सुरू राहील.
पुरंदर विमानतळाची साठी मोजणी प्रक्रियेला शुक्रवारी सुरुवात झाली असून, पाच पथकांची नियुक्ती केली आहे. गरजेनुसार ड्रोनचाही वापर केला जाणार आहे. पुढील २५ दिवस मोजणी प्रक्रिया सुरू राहणार आहे. मोजणी साठी शेतकऱ्यांचे पूर्ण सहकार्य मिळत आहे, असं जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सांगितलं.






