Kurla To Ghatkopar Flyover | मुंबईतील वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. विशेषतः कुर्ला ते घाटकोपर पश्चिम या मार्गावर नेहमीच वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. आता या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून (BMC)मोठे पाऊल उचलले गेले आहे. या भागात 4.2 किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल उभारण्यात येणार असून, या प्रकल्पामुळे हजारो प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. (LBS road traffic)
कुर्ल्यातील कल्पना टॉकिजपासून घाटकोपरच्या सर्वोदय रुग्णालयापर्यंत हा उड्डाणपूल उभारण्यात येईल. गेल्या तीन वर्षांपासून हा प्रकल्प रखडला होता, मात्र आता नौदल आणि पालिका अधिकाऱ्यांमधील चर्चा यशस्वी झाल्यानंतर मार्ग मोकळा झाला आहे. लवकरच या प्रकल्पासाठी निविदा प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
सध्या वाहतुकीची स्थिती :
एलबीएस रोडची सुरुवात सायनपासून होते आणि हा मार्ग कुर्ला, घाटकोपरमार्गे मुलुंडपर्यंत जोडला जातो. तसेच, फिनिक्स मार्केटसिटी मॉलहून साकीनाकामार्गे अंधेरीपर्यंतही हा मार्ग पोहोचतो. मात्र, कुर्ल्यातील कल्पना टॉकिजपासून सुरुवात होणारी वाहतूक कोंडी घाटकोपर, जरीमरी आणि अंधेरीपर्यंत पोहोचते. त्यामुळे प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो.
याच कारणास्तव, कल्पना टॉकिज ते घाटकोपर सर्वोदय रुग्णालयापर्यंत साधारण 4.2 किमी उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या पुलामुळे थेट घाटकोपरकडे जाणाऱ्या वाहनांना मोठा दिलासा मिळेल.
Kurla To Ghatkopar Flyover | उड्डाणपुलाची गरज आणि फायदे :
कुर्ला, घाटकोपर, अंधेरी (Andheri) आणि मुलुंड (Mulund) या पट्ट्यातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी असते. त्यातच रस्त्याच्या कडेला बेकायदेशीर बांधकामे आणि गाड्यांचे पार्किंग यामुळे समस्या अधिक गंभीर होते. या सर्वांचा विचार करूनच पालिकेने उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय घेतला आहे. (Kurla To Ghatkopar Flyover)
नवीन पुलामुळे वाहनांचा ताण कमी होईल आणि रस्त्यावरची गर्दी घटेल. प्रवासाचा वेळ वाचेल, कनेक्टिव्हिटी सुधारेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कुर्ला ते घाटकोपर प्रवास सुसाट होईल. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मुंबईतील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी मोठा दिलासा मिळेल, अशी अपेक्षा आहे.






