Kundmala Bridge Collapse | मावळ तालुक्यातील इंद्रायणी नदीवरील कुंडमळा पूल (Kundmala Bridge Collapse) रविवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास कोसळून मोठी दुर्घटना घडली. या घटनेत ४ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, ५० हून अधिक पर्यटक जखमी झाले आहेत. पूल कोसळल्यावर राज्यातील बचाव पथक, पोलीस आणि एनडीआरएफने घटनास्थळी धाव घेत शर्थीचे बचावकार्य सुरू केले. आता या घटनेमागचे प्रत्यक्षदर्शी आणि स्थानिक रहिवासी गणेश पवार यांनी पूल कोसळण्यामागचे खरे कारण उघड केले आहे.
पुणे जिल्ह्यातील कुंडमळा भागातील या लोखंडी पुलावर पर्यटकांची गर्दी आणि एकावेळी दुचाकींची दोन्ही बाजूंनी होणारी वाहतूक यामुळे तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे पुलाच्या क्षमतेपेक्षा जास्त भार वाढल्याने पूल कोसळला, अशी माहिती पवार यांनी दिली.
दुचाकीस्वारांमध्ये वाद, पूल हलू लागला आणि एक क्षणात दुर्घटना :
गणेश पवार यांनी सांगितले, “पूल छोटा असून एका वेळी एकच दुचाकी जाऊ शकते. मात्र त्या दिवशी दोन्ही बाजूंनी दुचाकी आल्याने वाद झाला. पर्यटक मोठ्या संख्येने पुलावरच थांबले होते. पूल हलू लागला आणि काही सेकंदात कोसळला.” पवार यावेळी घटनास्थळीच उपस्थित होते. त्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी स्वतः पूल कोसळताना अनुभवला असून, लोखंडी पट्टी पकडून आपला जीव वाचवला. त्यानंतर त्यांनी आणखी ३-४ पर्यटकांना बाहेर काढले. (Kundmala Bridge Collapse)
शनिवार-रविवारी पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे या पुलावर नियंत्रणाची गरज होती. प्रशासनाने काही दिवसांपूर्वी याठिकाणी पर्यटकांसाठी बंदी लागू केली होती, तरीही ती पाळली गेली नाही, हे या घटनेतून स्पष्ट होते.
Kundmala Bridge Collapse | पावसामुळे नदीचा धोका वाढला; मदत आणि बचावकार्य सुरूच :
गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे इंद्रायणी नदीच्या (Indrayani) पाण्याची पातळी खूप वाढली आहे. यामुळे बचावकार्य अधिक कठीण झाले आहे. एनडीआरएफ आणि पोलिसांनी शर्थीचे प्रयत्न करून आतापर्यंत अनेक पर्यटकांना सुरक्षित बाहेर काढले आहे. (Kundmala Bridge Collapse)
राज्याचे जलसंपदा आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी दुर्घटनास्थळी भेट दिली. त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ₹५ लाखांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. तसेच सर्व जखमींवर मोफत उपचार करण्याचे निर्देशही प्रशासनाला दिले आहेत.






