Kolhapur News | आयआयटी (IIT) बॉम्बेच्या संशोधकांनी केलेल्या अभ्यासातून समोर आले आहे की पश्चिम भारतातील काही प्रमुख शहरांमध्ये शहरी उष्णता बेट (Urban Heat Island) प्रभाव मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. या अभ्यासात महाराष्ट्र, कर्नाटक आणि गुजरातमधील नऊ शहरांचा विचार करण्यात आला असून कोल्हापूर शहर सर्वाधिक प्रभावित ठरले आहे.
कोल्हापुरात सर्वाधिक उष्णता वाढ-
अभ्यासानुसार, कोल्हापूर (Kolhapur News) शहरात मार्च ते मे या उन्हाळ्यापूर्वीच्या काळात पृष्ठभाग तापमानात लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून आले. शहरी आणि ग्रामीण भागातील तापमानातील तफावत काही वेळा 7 ते 10 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचत आहे. या काळात कोल्हापुरात शहरी उष्णता बेट (Surface Urban Heat Island) तीव्रतेचा आकडा 1.47 अंश सेल्सिअसपर्यंत गेला, जो आजूबाजूच्या भागांपेक्षा खूप जास्त आहे.
हा अभ्यास उपग्रह आकडेवारीवर आधारित असून, त्यात हे स्पष्ट झाले की कोल्हापुरातील तापमानवाढेचा परिणाम उष्णतेच्या टक्केवारीच्या दृष्टीने इतर शहरांपेक्षा अधिक आहे. याचे कारण म्हणजे याआधी कोल्हापूरचे तापमान तुलनेने कमी होते. याशिवाय, शहरातील वृक्षाच्छादनात केवळ 0.1 टक्क्यांची घट झाली असली तरी, तापमानात तब्बल 10 अंश सेल्सिअस वाढ झाली आहे.
वृक्षाच्छादन घट आणि उष्णतेचा संबंध-
संशोधकांनी तयार केलेल्या रिग्रेशन मॉडेल्सनुसार, वृक्षाच्छादन हे शहरी उष्णतेच्या नियंत्रणासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. अभ्यासानुसार, उन्हाळ्यापूर्वीच्या उष्णता प्रभावात (Kolhapur News) वृक्षाच्छादन 90 टक्क्यांपर्यंत आणि हिवाळ्यापूर्वीच्या उष्णतेत 84 टक्के परिणामकारक ठरू शकते. त्यामुळे शहरांतील तापमान कमी करण्यासाठी वृक्षलागवड हा एक महत्त्वाचा उपाय ठरू शकतो.
हिवाळ्यात पुणे शहरात उष्णतेचा प्रभाव सर्वाधिक जाणवतो, तर कोल्हापुरात तो उन्हाळ्याच्या पूर्वसंध्येला जास्त असतो. दुसरीकडे, हैदराबाद शहरात हुसैन सागर (Hussain Sagar) या मध्यवर्ती जलाशयामुळे शहरी थंड बेट (Urban Cool Island) प्रभाव आढळून आला आहे. त्यामुळे हैदराबादचे तापमान तुलनेने स्थिर राहते.






