Manikrao Kokate | कर्जमाफीच्या विषयावर प्रश्न विचारल्यावर कृषीमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांनी शेतकऱ्याला थेट सुनावत केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात खळबळ उडाली आहे. नाशिक दौऱ्यावर असताना कोकाटेंनी शेतकऱ्यांच्या तक्रारी ऐकताना त्यांच्या पैशाच्या वापराबाबत सवाल उपस्थित करत स्पष्टपणे नाराजी व्यक्त केली.
“कर्जमाफीची वाट बघा, पण पैसे शेतीत गुंतवा”
नाशिकमध्ये अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी माणिकराव कोकाटे गेले होते. यावेळी एका शेतकऱ्याने त्यांना कर्जमाफीबाबत थेट प्रश्न विचारला – “अजित पवार म्हणाले की कर्जमाफी होणार नाही, मग रेग्युलर कर्ज भरणाऱ्यांना कर्जमाफी मिळेल का?” या प्रश्नावर कोकाटे यांनी उत्तर देताना स्पष्टपणे नाराजी व्यक्त केली.
ते म्हणाले, “जे कर्ज वेळेवर फेडतात त्यांनी फेडावं. पण अनेक जण पाच-दहा वर्ष फक्त कर्जमाफीची वाट बघतात. कर्ज घेतात आणि काही भरत नाहीत. आणि जेव्हा कर्जमाफी होते, तेव्हा विचार करा, त्या पैशांचा उपयोग शेतीसाठी होतो का? एक रुपयाचीही गुंतवणूक शेतीत करता का?” असा थेट सवाल त्यांनी शेतकऱ्याला केला.
“साखरपुडे, लग्नासाठीच पैसे वापरता”
कोकाटे यांचे वक्तव्य इतक्यावरच थांबले नाही. त्यांनी पुढे म्हणताना सरकार शेतकऱ्यांना भांडवली गुंतवणुकीसाठी विविध योजना देते, त्यामध्ये पाईपलाईन, सिंचन, शेततळे अशा योजना समाविष्ट आहेत. पण शेतकऱ्यांकडून या निधीचा उपयोग शेतीत करण्याऐवजी वैयक्तिक खर्चासाठी होतो, अशी टीका त्यांनी केली.
“तुम्ही पीक विमा मागता, पण त्या पैशांतून साखरपुडे करता, लग्न करता,” असं विधान करत त्यांनी थेट शेतकऱ्यांच्या आर्थिक सवयींवरच प्रश्नचिन्ह निर्माण केलं. त्यांच्या या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया उमटत असून, अनेकांनी याला शेतकऱ्यांचा अपमान मानलं आहे.
Title: Kokate Criticizes Farmers Over Loan Waiver






