KL Rahul l सध्या दिल्ली कॅपिटल्सकडून आयपीएल 2025 मध्ये दमदार खेळ करणारा क्रिकेटपटू केएल राहुल (KL Rahul) एकेकाळी आपल्या एका हट्टामुळे आईच्या रोषाचा धनी झाला होता. वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी त्याने असं काही केलं, ज्यामुळे आईने त्याच्याशी बोलणंच बंद केलं होतं. हा किस्सा फारच कमी लोकांना माहित आहे.
आईच्या इशाऱ्याला डावलून केला टॅटू, झाला मोठा वाद :
राहुलला लहानपणापासूनच खेळाची आवड होती. त्याचे वडील के.एन. लोकेश आणि आई राजेश्वरी हे दोघेही शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असून, त्यांनी राहुलच्या खेळण्यावर कधीही बंदी घातली नाही. मात्र त्यांनी एक अट घातली होती—खेळामुळे अभ्यासावर परिणाम होता कामा नये. राहुलनेही अभ्यास आणि खेळ यात योग्य तो समतोल राखत आपलं करिअर घडवलं.
पण वयाच्या 15 व्या वर्षी राहुलने आई-वडिलांना न सांगता आपल्या शरीरावर पहिला टॅटू गोंदवला. स्टाईलसाठी प्रसिद्ध असलेला इंग्लंडचा फुटबॉलपटू डेविड बेकहम (David Beckham) हा राहुलचा आदर्श होता, आणि त्याचप्रमाणे त्यानेही टॅटू करवून घेतला. हे कृत्य समजताच राहुलची आई फार संतापली. तिने थेट त्याच्याशी काही दिवस अबोला धरला. त्या वयात टॅटू करवणं तिच्यासाठी अकल्पनीय होतं, त्यामुळे तिने हे वागणं अजिबात मान्य केलं नाही.
KL Rahul l राहुल द्रविड आदर्श, पण बेकहमचा स्टाईल इम्पॅक्ट मोठा :
क्रिकेटमध्ये राहुल द्रविड (Rahul Dravid) यांना आदर्श मानणारा केएल राहुल स्टाईलच्या बाबतीत मात्र पूर्ण वेगळा होता. इंग्लंडचा फॅशन आयकॉन डेविड बेकहम यानेच त्याला टॅटूंसाठी प्रेरित केलं. त्यामुळे 15व्या वर्षी घरच्यांना न सांगता त्याने टॅटू काढला आणि तो त्याच्या आयुष्यातील पहिला बंडखोरीचा प्रसंग ठरला.
आईने त्याच्याशी बोलणं बंद केल्यानंतर राहुलला आपल्या कृत्याची जाणीव झाली. नंतर त्याने त्याचा अभ्यास, खेळ आणि जबाबदारीच्या भावनेतून आपल्या आई-वडिलांचं मन जिंकलं. आज त्याच्या शरीरावर असलेले अनेक टॅटू त्याच्या वैयक्तिक शैलीचा भाग आहेत, पण त्यामागे दडलेली ही कथा आजही आठवली जाते.






