Aditya Thackeray | भाजप नेते रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वातील शिवसेना निवडणुकीपर्यंत राहणार नाही, असा दावा केला होता. त्यावर जोरदार प्रत्युत्तर देताना ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी भाजप आणि दानवे यांच्यावर टीकेची झोड उठवली. खैरे यांनी २०२९ मध्ये आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) मुख्यमंत्री होतील, असा थेट दावा केला आहे.
खैरे यांचा पलटवार
खैरे म्हणाले की, रावसाहेब दानवे हे नेहमी विरोधाभासी बोलतात. एकीकडे ते म्हणतात आम्ही काँग्रेससोबत गेलो, पण खरं म्हणजे युतीच्या काळातही त्यांनीच काँग्रेसमध्ये घुसखोरी केली होती. २०१९ मध्ये त्यांनी आमच्या कार्यकर्त्यांना आणि स्वतःच्या पक्षातील लोकांनाही पैसे वाटले आणि माझा पराभव केला, असं गंभीर आरोप खैरेंनी केला.
खैरे पुढे म्हणाले, “हीच तुमची प्रामाणिकता का?” शिवसेनेची खरी विचारधारा आणि कडवटपणा आज उद्धव ठाकरे घेऊन चालले आहेत. अशा सच्च्या शिवसैनिकांना सोबत घेत उद्धव ठाकरे राज्यभर काम करत आहेत. भाजप आता तीन आमदारांचे कौतुक करत असला, तरी शिवसेनेची ताकद अजूनही लोकांमध्ये आहे.
आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करणार- खैरे
खैरे यांनी मोठा राजकीय दावा करत सांगितलं की, “२०२९ मध्ये निवडणुका आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात लढवण्यात येतील आणि त्या निवडणुकांनंतर आदित्य ठाकरे हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील.” त्यांनी यावेळी भाजपवर आणि शिंदे गटावरही टीका करत म्हटलं की, “एक घर, एक तिकीट ही भाजपची शिस्त असताना, दानवे गटात दोन तिकिटं घेतली जातात, आणि मुलीलाही शिंदे गटातून उभं केलं जातं.”
तसेच खैरे म्हणाले, “दानवे यांचं आता भाजपमध्येही महत्त्व उरलेलं नाही. त्यांच्या निर्णयांकडे कोणी लक्ष देत नाही. बळजबरीने आपली जागा बनवणारे हे लोक अध:पतनाच्या वाटेवर आहेत.” त्यांनी अमेरिकेतील ट्रम्पच्या उदाहरणाचा उल्लेख करत म्हटलं की, “प्रत्येक लोकशाहीत लोक शेवटी रस्त्यावर उतरतात. इथंही तेच होणार.”
Title: Khaire: Aditya Thackeray Will Be CM in 2029






