Ketan Agrawal Death | केतन अग्रवाल हत्या प्रकरणात (Ketan Agrawal Case) पोलीस तपासादरम्यान अत्यंत धक्कादायक आणि थरारक माहिती समोर आली आहे. हा निव्वळ अपघात नसून अत्यंत थंड डोक्याने रचलेला मर्डर प्लॅन असल्याचे पोलीस तपासात स्पष्ट होत आहे.
लोहगड किल्ल्यावर (Lohagad Fort) घडलेल्या घटनेपूर्वीच केतनचा मोबाईल मुख्य आरोपी सिया गोयल (Siya Goyal) हिच्या ताब्यात असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. हत्येशी संबंधित महत्त्वाची माहिती नष्ट करण्यासाठी फोनमधील डेटा हटविण्यात आल्याची शक्यता तपासली जात असून, संबंधित मोबाईल डिजिटल फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे.
मोबाईलमधील डेटा डिलीट केल्याचा संशय
या प्रकरणातील आरोपी सिया गोयल (Siya Goyal) आणि चेतन चौधरी (Chetan Chaudhary) यांना ३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. कोठडी वाढवून देण्याची मागणी करताना पोलिसांनी न्यायालयाला सांगितले की, गुन्ह्याशी संबंधित महत्त्वाचे डिजिटल पुरावे जाणीवपूर्वक नष्ट करण्यात आले आहेत का, याचा तपास करणे आवश्यक आहे. त्यामुळे केतनच्या मोबाईलमधील डिलीट झालेला डेटा पुन्हा मिळविण्यासाठी फॉरेन्सिक विश्लेषण सुरू करण्यात आले आहे.
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, १८ जून रोजी लोहगडावर घटना घडल्यानंतर केतनचे कुटुंबीय घटनास्थळी पोहोचण्यापूर्वी काही काळ त्याचा मोबाईल सियाकडे होता. त्यानंतर तिने तो फोन नातेवाईकांच्या स्वाधीन केला. मात्र, त्याआधी मोबाईलमधील चॅट, कॉल रेकॉर्ड किंवा इतर महत्त्वाची माहिती हटविण्यात आली होती का, याची पोलिसांकडून पडताळणी केली जात आहे. प्राथमिक चौकशीत सिया आणि चेतन यांनी एकमेकांमधील अनेक संदेश आधीच डिलीट केल्याचेही उघड झाले आहे.
हत्येचा कट आणि आरोपींची तयारी उघड
लोहगडावर करण्यात आलेल्या ‘क्राइम सीन री-क्रिएशन’मधून हत्येचे नियोजन अत्यंत बारकाईने करण्यात आल्याचे समोर आले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, सिया आणि चेतन यांनी आधीच एका विशिष्ट इशाऱ्यावर कारवाई करण्याचे ठरवले होते. १८ जून रोजी सकाळी केतन आणि सिया लोहगडावर पोहोचल्यानंतर हुडी घालून आलेला चेतन काही अंतरावरून त्यांचा पाठलाग करत होता, जेणेकरून कोणाचाही संशय येऊ नये.
निर्जन ठिकाणी पोहोचल्यानंतर सिया जमिनीवर बसली आणि तोच हल्ल्याचा ठरलेला संकेत होता. त्यानंतर चेतनने मागून येत केतनला सुमारे ३५० फूट खोल दरीत ढकलल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. तपासात असेही समोर आले आहे की, या घटनेपूर्वीच सियाने केतनचा मोबाईल स्वतःच्या ताब्यात घेतला होता. तसेच, मोबाईल लोकेशनवरून स्वतःचा माग काढता येऊ नये म्हणून चेतनने हत्येच्या दिवशी स्वतःचा फोन घरी ठेवला होता आणि दुकानातील एका कर्मचाऱ्याचा मोबाईल वापरला होता. पुणे ग्रामीण पोलीस (Pune Rural Police) यांच्या मते, ही घटना अपघात नसून पूर्वनियोजित हत्या असल्याचे प्राथमिक तपासातून स्पष्ट होत आहे. फॉरेन्सिक अहवाल आल्यानंतर मोबाईलमधील डिलीट झालेला डेटा उपलब्ध झाल्यास या गुन्ह्यामागील हेतू आणि इतर महत्त्वाचे पुरावे समोर येण्याची शक्यता आहे.
News Title: Ketan Agrawal death Case Siya Goyal Digital Evidence Lohagad Fort






