Karuna Sharma | राष्ट्रवादी काँग्रेस (Ajit Pawar Group) नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि करुणा शर्मा (Karuna Sharma) यांच्यातील वाद पुन्हा एकदा न्यायालयात चर्चेचा विषय ठरला आहे. पोटगीसंदर्भात सुरू असलेल्या खटल्यात विवाहाचा दावा आणि त्यावर आधारित हक्कांचे प्रश्न उपस्थित करण्यात आले असून, याच प्रकरणाची सुनावणी आज (29 मार्च 2025) माझगाव सत्र न्यायालयात पार पडली.
मुले होणं म्हणजे विवाह होतो-
धनंजय मुंडे यांनी करुणा शर्मा यांच्याशी अधिकृत विवाह केला नाही, असा ठाम युक्तिवाद त्यांच्याकडील वकिलांनी न्यायालयात केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, करुणा शर्मा या मुंडे यांच्या दोन मुलांच्या आई असल्या तरी, अधिकृत विवाह झाला नव्हता. त्यांच्यातील संबंध परस्पर संमतीचे होते आणि त्यास पती-पत्नीसारखी मान्यता देता येत नाही, असं स्पष्ट करण्यात आलं.
या युक्तिवादावर न्यायालयाने विचारणा केली की, जेव्हा मुंडे यांनी स्वतः मुलांना स्वीकारलं आहे, नावं दिली आहेत, तेव्हा करुणा शर्मा त्यांच्या आई का नाहीत? यावर मुंडेंच्या वकिलांनी सांगितलं की, केवळ काही काळ एकत्र राहणं आणि मुले होणं म्हणजे विवाह होतो, असा निष्कर्ष काढता येत नाही. शिवाय करुणा शर्मा आर्थिकदृष्ट्या सक्षम असून, त्यांचा वर्षिक उत्पन्न सुमारे 15 लाख रुपये आहे आणि त्या नियमित कर भरतात, म्हणूनही त्यांना पोटगीची गरज नाही, असं मत त्यांनी मांडलं.
करुणा आणि धनंजय मुंडेयांचा विवाह झाला होता?
करुणा शर्मा यांच्या वकिलांनी युक्तिवाद केला की, वर्ष 1998 मध्ये करुणा शर्मा आणि धनंजय मुंडे यांचा विवाह झाला होता. त्या विवाहानंतर त्यांना अपत्य झाले असून, एकत्र राहिल्याचे आणि त्यांच्या सहजीवनाचे पुरावे त्यांच्याकडे आहेत. यामध्ये दोघांचे फोटो आणि इतर दस्तऐवजांचा समावेश आहे.
मात्र न्यायालयाने करुणा शर्माच्या वकिलांना विचारलं की, या विवाहाचे प्रत्यक्ष पुरावे काय आहेत? त्यावर त्यांनी थेट उत्तर न देता, आवश्यक पुरावे सादर करण्यासाठी थोडा वेळ मागितला. न्यायालयाने त्यांच्या विनंतीला मान्यता देत पुढील सुनावणीसाठी 5 एप्रिल 2025 ही तारीख निश्चित केली आहे.






