Karuna Munde | महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड खळबळ उडवणारा नवा गौप्यस्फोट समोर आला आहे. मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यातील वाद आता शिगेला पोहोचला आहे. जरांगे यांनी आपल्या हत्येचा कट रचल्याचा आरोप धनंजय मुंडेंवर केल्यानंतर, आता स्वराज्य शक्ती सेनेच्या अध्यक्षा करुणा मुंडे यांनी या प्रकरणात थेट उडी घेतली असून त्यांनी मुंडेंवर आणखी गंभीर आरोपांचा भडिमार केला आहे.
करुणा मुंडेंनी दावा केला आहे की, “मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या हत्येचा कट धनंजय मुंडेंनीच रचला आहे. या प्रकरणात आरोपी दादा गरड याच्याशी धनंजय मुंडे यांचे थेट संबंध आहेत.” यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होताना दिसत आहे.
‘दादा गरड तीन वेळा माझ्याकडे आला’, करुणा मुंडेंचा दावा :
करुणा मुंडेंनी पुढे सांगितले की, “दादा गरड माझ्याकडे तीन वेळा आला होता. जेव्हा मी जरांगेकडे गेले, तेव्हा त्याने मला मेसेज केला आणि लगेच धनंजय मुंडेंना माहिती मिळाली की मी मनोज जरांगेंकडे गेले आहे.” त्या पुढे म्हणाल्या, “धनंजय मुंडे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आतील टीम फोडण्याचे काम केले आहे. ते स्वत:च्या बायकोला सोडले नाहीत, मग इतरांशी काय न्याय करणार?”
या वक्तव्यांमुळे धनंजय मुंडे आणि करुणा मुंडे यांच्यातील जुना वाद पुन्हा चिघळला आहे. करुणा मुंडेंनी थेट म्हणाले की, “मुंडे यांनीच हल्ल्याचा कट रचला असून याबाबत माझ्याकडे ठोस पुरावे आहेत.”
Karuna Munde | १ कोटींची डील आणि सॉरीचा मेसेज :
या प्रकरणातील सर्वात धक्कादायक भाग म्हणजे करुणा मुंडेंनी (Karuna Munde) केलेला आर्थिक व्यवहाराचा खुलासा. त्या म्हणाल्या, “धनंजय मुंडे यांनी आरोपी दादा गरडला पाच लाख रुपये पाठवले आणि त्याला ‘सॉरी’ असा मेसेज केला. एका गरीब व्यक्तीला मंत्री ‘सॉरी’ का बोलतात? हेच संशयास्पद आहे. त्यांची एक कोटी रुपयांची डील सुरू होती. हे सर्व पुरावे त्यांच्या मोबाईलमध्ये आहेत.”
त्यांनी पुढे सांगितले की, “दुसऱ्या आरोपीचे रेकॉर्डिंग देखील माझ्याकडे आहे आणि सत्य बाहेर यावे म्हणून धनंजय मुंडे, मनोज जरांगे पाटील आणि माझी नार्को टेस्ट घ्यावी,” अशी मागणी त्यांनी केली आहे.
‘मुंडेंना देशातून बाहेर काढा’, करुणा मुंडेंची मागणी :
करुणा मुंडेंनी आपली भूमिका अधिक तीव्र करताना म्हटले की, “धनंजय मुंडे सारखी नासकी वृत्ती संपवायची आहे. त्यांना मराठवाड्यातून नव्हे तर देशातून बाहेर काढून अमेरिकेला पाठवा. त्यांची आमदारकी तात्काळ रद्द करावी.” त्या पुढे म्हणाल्या, “या संघर्षामुळे मी एकटी पडली आहे, आणि आत्महत्या करण्याची वेळ माझ्यावर आली आहे.”
राज्याच्या राजकीय वर्तुळात या वक्तव्यांनंतर पुन्हा एकदा खळबळ माजली असून, या प्रकरणात पुढील घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






