Karuna Munde | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात पुन्हा स्थान देण्याच्या चर्चेवरून, करुणा मुंडे आक्रमक झाल्या आहेत. धनंजय मुंडे यांना मंत्रिपद देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत, अशी मागणी करुणा मुंडे यांनी केली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा संदर्भ देत, “संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांचे तुम्हाला दुःख दिसत नाही,” अशी घणाघाती टीका करुणा मुंडे यांनी केली आहे.
करुणा मुंडे यांनी म्हटलं आहे की, “महादेव मुंडे, झरीन शेख, काका गर्जे अशी अनेक प्रकरणं आहेत. शासन, प्रशासनाला हाताशी धरून या लोकांनी बीडमध्ये काळा बाजार करून ठेवला आहे.” तसेच, “तुमच्याकडे चांगले लोक नसतील, तर तुमचा पक्ष बंद करून टाका,” असा सल्लाही करुणा मुंडे यांनी अजित पवार यांना दिला, ज्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
करुणा मुंडेंचा इशारा
पालकमंत्री असतानाही तुम्हाला बीडच्या जनतेचे, करुणा मुंडे यांचे, ज्ञानेश्वरी मुंडे, संतोष देशमुख यांच्या कुटुंबाचे दुःख दिसत नसेल, तर तुम्ही सगळ्यांना विष पाजा आणि त्यानंतरच धनंजय मुंडे यांना मंत्रिपद द्या, असा हल्लाबोल करुणा मुंडे यांनी केला. या विधानामुळे मुंडे कुटुंबातील वाद आणि राजकीय संघर्ष अधिक तीव्र झाल्याचे दिसून येते.
करुणा मुंडे यांनी अजित पवारांवर सत्य ऐकण्याची शक्ती नसल्याचा आरोप केला आहे. “तुम्ही धनंजय मुंडे यांना मंत्रिपद दिले, तर मी महाराष्ट्राच्या संपूर्ण जनतेला घेऊन रस्त्यावर उतरणार आहे,” असा थेट इशाराच करुणा मुंडे यांनी अजित पवार यांना दिला आहे. त्या म्हणाल्या की, “संतोष देशमुख हत्या प्रकरणात आम्ही धनंजय मुंडे यांना सहआरोपी करू. त्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. महाराष्ट्रातल्या जनतेला घेऊन आम्ही अजित पवार यांच्या घरासमोर बसणार आहोत. आम्ही मनमानी चालू देणार नाही,” असा पवित्रा करुणा मुंडे यांनी घेतला आहे.
Karuna Munde | धनंजय मुंडेंना क्लीनचिट
दरम्यान, धनंजय मुंडे कृषिमंत्री असताना त्यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप करण्यात आले होते. याच प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना क्लीनचिट दिली आहे. त्यानंतर अजित पवार यांनी विधान केले होते की, त्यांची आणखी एका प्रकरणात चौकशी सुरू आहे.
त्यातही क्लीनचिट मिळाली, तर आम्ही मुंडे यांना पुन्हा मंत्रिपद देण्याबाबत विचार करू. अजित पवार यांच्या या विधानानंतर मुंडे यांचा पुन्हा मंत्रिमंडळात समावेश होणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात होता. अजित पवार यांच्या विधानानंतर विरोधकांनी त्यांच्यावर सडकून टीका केली होती आणि मुंडे यांना मंत्रिमंडळात घेण्याची घाई केली जात आहे, असा हल्लाबोल केला होता.






