Crime News | कल्याण (Kalyan) शहरातील खडकपाडा (Khadakpada) पोलीस ठाण्याच्या हद्दीतून माणुसकीला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. एका तरुणाने आपल्या प्रेयसीचा विश्वासघात करत केवळ लैंगिक अत्याचारच केला नाही, तर तिचा मोबाईल हॅक करून, अश्लील व्हिडीओ बनवून तिला आणि तिच्या कुटुंबाला ब्लॅकमेल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आरोपी एका राजकीय पक्षाचा पदाधिकारी असल्याचेही कळते.
लग्नाच्या नावाखाली लैंगिक शोषण
पीडित २९ वर्षीय तरुणी आणि आरोपी यांच्यात प्रेमसंबंध होते. आरोपीने तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत अनेकदा शारीरिक संबंध प्रस्थापित केले. याच काळात त्याने पीडितेच्या नकळत तिचे खासगी क्षण मोबाईलमध्ये रेकॉर्ड केले.
आरोपी एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने पीडितेचा मोबाईल हॅक करून तिच्या प्रत्येक हालचालीवर पाळत ठेवली. तो सतत तिच्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत होता, ज्यामुळे तिचे खाजगी आयुष्य पूर्णपणे धोक्यात आले होते.
ब्लॅकमेलिंग, कुटुंबीयांना धमक्या
आरोपी या खासगी व्हिडीओ आणि फोटोंच्या आधारे पीडितेला सतत ब्लॅकमेल करत होता. त्याने तिच्या आई-वडिलांना आणि भावालाही हे व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत जीवे मारण्याची धमकी दिली. एके दिवशी, पीडितेच्या हाती आरोपीचा मोबाईल लागला, तेव्हा तिला धक्काच बसला. त्यात केवळ तिचेच नाही, तर इतर अनेक मुलींचे अश्लील व्हिडीओ आढळून आले.
हे पुरावे हाती लागल्यानंतर पीडितेने तो मोबाईल स्वतःकडे ठेवला. मात्र, यामुळे आरोपी अधिकच संतापला. त्याने आपला मोबाईल परत मिळवण्यासाठी पीडितेच्या कुटुंबीयांना पुन्हा धमकावले आणि शिवीगाळ केली. इतकेच नाही, तर आपले राजकीय वजन वापरून त्याने पोलिसांकडे जाऊन पीडितेवरच मोबाईल चोरीचा खोटा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी पीडितेची सखोल चौकशी केली असता, सत्य समोर आले. पोलिसांना आरोपीच्या मोबाईलमधील अश्लील व्हिडीओ सापडले असून, त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.






