उद्धव ठाकरेंना मोठा झटका; कोर्टात हजर राहण्याचे दिले आदेश

On: July 30, 2026 12:07 PM
Uddhav Thackeray
---Advertisement---

Uddhav Thackeray | राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (उबाठा) प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना 2009 च्या लोकसभा निवडणुकीशी संबंधित जुन्या प्रकरणात कल्याण न्यायालयाने समन्स बजावले आहेत. न्यायालयाने त्यांना 5 ऑगस्ट रोजी उपस्थित राहण्याचे निर्देश दिले असून, ते स्वतः हजर राहणार की वकिलामार्फत बाजू मांडणार याकडे राजकीय वर्तुळासह सर्वांचे लक्ष लागले आहे.

2009 च्या प्रचारसभेतील व्हिडिओवरून वाद :

22 एप्रिल 2009 रोजी झालेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान कल्याण मतदारसंघात वसंत डावखरे (Vasant Davkhare) आणि आनंद परांजपे यांच्यात लढत झाली होती. त्या निवडणुकीत आनंद परांजपे यांच्या प्रचारासाठी घेतलेल्या सभेत उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार वसंत डावखरे यांचा एक व्हिडिओ दाखवला होता. त्या व्हिडिओमध्ये डावखरे कार्यकर्त्यांना निवडणूक जिंकण्यासाठी पोलिस आणि निवडणूक अधिकाऱ्यांची भीती न बाळगण्याचे आवाहन करत असल्याचा दावा करण्यात आला होता.

या घटनेनंतर वसंत डावखरे यांनी संबंधित व्हिडिओ बनावट असल्याचा आरोप करत न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणात उद्धव ठाकरे यांच्यासह एकनाथ शिंदे (Eknath Shinde), आनंद परांजपे आणि रमाकांत देवळेकर (Ramakant Deolekar) यांच्याविरोधात त्यांनी खटला दाखल केला होता. त्याच प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान आता न्यायालयाने उद्धव ठाकरे यांना समन्स बजावत 5 ऑगस्ट रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

Uddhav Thackeray | मॉर्फिंगचा आरोप, पुढील सुनावणीकडे लक्ष :

त्या काळात तत्कालीन शिवसेनेचे कार्याध्यक्ष असलेल्या उद्धव ठाकरे यांनी डोंबिवली (Dombivli) येथील प्रचारसभेत हा व्हिडिओ सार्वजनिकरित्या दाखवला होता. मात्र, वसंत डावखरे यांनी त्या व्हिडिओतील वक्तव्ये आपली नसल्याचा दावा केला होता. संबंधित व्हिडिओ मॉर्फ करण्यात आला असून, त्यातील मजकूर निवडक पद्धतीने संपादित करून स्वतःची बदनामी करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप त्यांनी केला होता. दुसरीकडे, शिवसेनेकडून हा व्हिडिओ खरा असल्याचा दावा करण्यात आला होता आणि निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्याची भूमिकाही घेण्यात आली होती. या वादातूनच डावखरे यांनी न्यायालयीन लढाई सुरू केली होती.

दरम्यान, या प्रकरणातील मुख्य तक्रारदार वसंत डावखरे यांचे निधन झाले आहे. त्यामुळे पुढील सुनावणीत या प्रकरणाची दिशा काय राहणार, न्यायालयात उद्धव ठाकरे कोणती भूमिका मांडणार आणि डावखरे कुटुंबीयांची भूमिका काय असेल, याबाबत उत्सुकता वाढली आहे. 5 ऑगस्ट रोजी होणाऱ्या सुनावणीनंतर या प्रकरणातील पुढील घडामोडी अधिक स्पष्ट होण्याची शक्यता आहे. सध्या तरी डावखरे कुटुंबीयांकडून या समन्सबाबत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

News Title: Kalyan Court Summons Uddhav Thackeray

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now