Jyoti Malhotra | हरियाणाच्या युट्यूबर ज्योती मल्होत्रा (Jyoti Malhotra) हिला भारतात गुप्त माहिती पाकिस्तानला पुरवल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. तिच्या अटकेनंतर अनेक धक्कादायक गोष्टी उघड झाल्या असून, ती पाकिस्तानात हेरगिरीचे प्रशिक्षण घेत होती, असा खुलासा पोलिसांनी केला आहे. विशेष म्हणजे, ती गेल्या महिन्यातील पहलगाम हल्ल्याच्या थोड्याच आधी पाकिस्तानातील मुरीदके येथे १४ दिवस राहत होती. त्या दरम्यान तिने खास मिशनसाठी ट्रेनिंग घेतलं.
पोलिस सूत्रांनुसार, पाकिस्तानमधून परतल्यावर ती भारतात एक सोशल मीडिया मोहिम राबवणार होती. या मोहिमेचा उद्देश भारताविरुद्ध डिजिटल युद्ध छेडणे असा होता. ज्योतीने पाकिस्तानात घेतलेल्या प्रशिक्षणाबाबत अजूनही अनेक प्रश्न अनुत्तरित असून, तिचे उद्दिष्ट काय होते हे स्पष्ट झालेले नाही. मात्र पहलगाम हल्ल्याशी संबंधित काही बाबी तीच्याशी जोडल्या जात असल्याने चौकशी अधिक खोलात सुरू आहे.
पासपोर्टवरील तीन एंट्री, पण बेकायदेशीर प्रवेशाचाही संशय :
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्योतीने तीन वेळा पाकिस्तान दौरा केला असून ती करतारपूर साहिब मार्गे पाकिस्तानात गेली होती. पहिल्या वेळी तिने स्वतःहून व्हिसा मिळवला, परंतु पुढील वेळेस पाक उच्चायोगातील अधिकारी दानिशने तिला मदत केली होती. विशेष म्हणजे आणखी दोन-तीन वेळा ती पाकिस्तानात गेल्याचा संशय व्यक्त केला जातो, पण त्या दौऱ्याची नोंद तिच्या पासपोर्टवर नाही. यामुळे तिने बेकायदेशीरपणे सीमा ओलांडली असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Jyoti Malhotra Arrest)
तिचा पाकिस्तान दौरा हा साधा दौरा नव्हता. ती तिसऱ्यांदा पाकिस्तानात गेली तेव्हा इस्लामाबाद मार्गे मुरीदके या ठिकाणी पोहोचली. तिथे १४ दिवसांचे हेरगिरीचे प्रशिक्षण देण्यात आले. हे प्रशिक्षण एका विशेष डिजिटल मोहिमेसाठी होते. परतल्यानंतर ती भारतात सोशल मीडिया व्दारे हेरगिरी करण्याच्या कामात सक्रिय होणार होती. मात्र, पहलगाम हल्ल्यामुळे ती योजना काही काळासाठी थांबवण्यात आली.
Jyoti Malhotra | मिशनमध्ये इतरही इन्फ्लुएंसर सहभागी? :
पोलिसांचा संशय आहे की, ज्योती मल्होत्रा ही या मोहिमेतील एकमेव सदस्य नव्हती. या डिजिटल मोहिमेमध्ये भारतातील सुमारे दोन डझन सोशल मीडिया इन्फ्लुएंसर सहभागी होते. यातील बहुतेकांकडे लाखो फॉलोअर्स आहेत. या मोहिमेचा उद्देश भारतीय जनतेच्या मनात पाकिस्तानबद्दल सहानुभूती निर्माण करून सरकारविरोधात वातावरण निर्मिती करणे असा होता.
हिसारचे पोलीस अधीक्षक शशांक कुमार सावन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, हे युद्ध केवळ सीमांवर नाही, तर शत्रु देशाच्या आतही लढले जात आहे. ज्योती मल्होत्राच्या चौकशीनंतर त्यांनी स्पष्ट केले की, पाकिस्तानने भारतात डिजिटल युद्ध छेडण्याचा डाव रचला आहे आणि ज्योती ही त्यात एक प्यादं होती. ही मोहिम भारतात अस्थिरता निर्माण करण्याच्या उद्देशाने राबवली जात होती.






