Jyoti Malhotra | हिसारच्या न्यू अग्रसेन कॉलनीत राहणारी यूट्यूबर ज्योती मल्होत्रा (Jyoti Malhotra Youtuber), जी पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटकेत आहे, तिचे आयुष्य एका डिनरमुळे पूर्णपणे बदलले, अशी खळबळजनक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. एका सामान्य कुटुंबातील मुलगी असलेल्या ज्योतीला आलिशान जीवनशैली जगण्याची तीव्र इच्छा होती आणि याच हव्यासापोटी ती देशविरोधी कृत्यांमध्ये सामील झाली, असे म्हटले जात आहे.
जीवनातील संघर्ष
वडिलांसोबत एका लहान घरात राहणाऱ्या ज्योतीने उच्च माध्यमिक शिक्षणानंतर लगेच नोकरी शोधण्यास सुरुवात केली होती, कारण तिला लवकर पैसे कमवायचे होते. सुमारे १४ वर्षांपूर्वी तिने एका कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून पहिली नोकरी स्वीकारली. त्यानंतर तिने हिसारपासून २० किलोमीटर दूर असलेल्या एका खासगी शाळेत शिक्षिका म्हणूनही काम केले, पण तिथेही ती फार काळ रमली नाही आणि पुन्हा हिसारमधील एका कॉलेजजवळ असलेल्या मार्केटमध्ये एका खासगी कार्यालयात रिसेप्शनिस्ट म्हणून रुजू झाली. तिचे आयुष्य सतत नवीन नोकऱ्या शोधण्यात आणि सोडण्यातच पुढे सरकत राहिले, कारण तिला तिच्या स्वप्नांसारखे जीवन जगता येत नव्हते.
कोरोना काळात गुरुग्राममधील तिची शेवटची नोकरी सोडल्यानंतर ज्योती मल्होत्रा हिसारला परतली आणि तिथेच तिने सोशल मीडियावर व्हिडिओ बनवण्यास सुरुवात केली. यूट्यूब व्हिडिओ आणि ट्रॅव्हल ब्लॉगिंगमधून तिला पैसे मिळू लागल्यावर तिने याच मार्गावर पुढे जाण्याचा निर्णय घेतला आणि येथूनच तिच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. मोठ्या गाड्यांमध्ये फिरणे, उच्चभ्रू लोकांसोबत उठणे-बसणे, चंगळ करणे आणि बँक खात्यात मोठी रक्कम असणे यांसारख्या इच्छांमुळे ती देशविरोधी कारवायांच्या मार्गावर गेली. तिने हिसारमधील एफसी वुमन कॉलेजमधून बीएची पदवी घेतली आहे आणि ती तिच्या आई-वडिलांची एकुलती एक मुलगी आहे.
‘ट्रॅव्हल विथ जो’ चॅनेलची लोकप्रियता
ज्योती मल्होत्राच्या ‘ट्रॅव्हल विथ जो’ या यूट्यूब चॅनेलला ३.७७ लाख फॉलोअर्स आहेत, तर इंस्टाग्रामवर तिचे १.३१ लाख फॉलोअर्स आहेत. ती देश-विदेशातील विविध पर्यटन स्थळांची माहिती आणि प्रसिद्ध ठिकाणांचे व्हिडिओ शेअर करते. तिच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही चांगला प्रतिसाद मिळतो. ज्योतीने २२ ऑक्टोबर २०१८ रोजी पासपोर्ट बनवला होता. त्यानंतर काही काळ नोकरी केल्यानंतर, सुमारे तीन वर्षांपूर्वी तिने ‘ट्रॅव्हल विथ जो’ या नावाने यूट्यूब चॅनेल सुरू केले आणि नियमित व्हिडिओ बनवण्यास सुरुवात केली.
तपासात असे समोर आले आहे की, दिल्लीतील पाकिस्तान दूतावासातील कर्मचारी एहसान-उर-रहीम ऊर्फ दानिश याच्या संपर्कात ज्योती आली आणि हळूहळू ती गुप्तहेरगिरीच्या जाळ्यात ओढली गेली. तिने दानिशचा मोबाईल नंबर मिळवला आणि त्यांच्यात संवाद सुरू झाला. त्यानंतर ज्योतीने दोन वेळा पाकिस्तानचा प्रवास केला होता. गुप्तचर विभागाच्या माहितीनुसार, ज्योती दोन वेळा दिल्लीहून शीख जत्थ्यासोबत आणि एकदा एकटीच करतारपूर साहिब गुरुद्वाऱ्याच्या दर्शनासाठी पाकिस्तानात गेली होती. याव्यतिरिक्त, तिने दुबई, थायलंड, इंडोनेशिया, नेपाळ, भूतान, चीन आणि बांगलादेशचाही प्रवास केला आहे.
पाकिस्तान दूतावासातील कर्मचारी एहसान उर रहीम उर्फ दानिशने ज्योतीला डिनरसाठी आमंत्रित केले होते आणि याच भेटीदरम्यान दोघांमध्ये संवाद झाला, तसेच ज्योतीने एक व्हिडिओही रेकॉर्ड केला. त्यानंतर दानिश आणि त्याचा साथीदार अली एहसान यांनी ज्योतीची ओळख पाकिस्तानच्या गुप्तचर अधिकाऱ्यांशी करून दिली. ज्योती मल्होत्रा पाकिस्तान दूतावासातील अधिकाऱ्यांच्या सतत संपर्कात होती आणि त्यांच्या कार्यक्रमांनाही हजेरी लावत होती. तिचा पाकिस्तान दौराही स्पॉन्सर करण्यात आला होता. हिसार पोलिसांच्या सूत्रांनुसार, ज्योतीशी संबंधित अनेक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स देखील सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर आहेत आणि लवकरच त्यांची चौकशी केली जाणार आहे.
ज्योती मल्होत्राला सध्या पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून, तिची कसून चौकशी सुरू आहे. हिसार पोलिसांची आयटी सेल आणि सायबर शाखा तिच्या लॅपटॉप, मोबाईल फोन आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांची तपासणी करत आहेत. त्याचबरोबर तिचे बँक खाते आणि विदेश प्रवास, विशेषतः पाकिस्तान, चीन आणि काश्मीर दौऱ्याची सखोल चौकशी केली जात आहे. चौकशीदरम्यान असेही समोर आले आहे की, ज्योती पाकिस्तानमधील काही उच्चभ्रू लोकांशी संपर्कात होती आणि या भेटींमागचे नेमके कारण काय होते, याचा तपास सध्या सुरू आहे. तसेच, तिने भारतातील कोणतीही संवेदनशील माहिती पाकिस्तानला पुरवली आहे का, याचीही पडताळणी केली जात आहे. ज्योतीला कोण-कोण लोक मदत करत होते आणि तिच्या सर्व व्हिडिओ तसेच डिजिटल कंटेंटची सखोल तपासणी केली जात आहे, असे पोलिसांनी सांगितले आहे. हिसार पोलिसांच्या माहितीनुसार, सुरक्षा यंत्रणांनी पाकिस्तान दूतावासातील पारितोषिक सोहळ्यात सहभागी होणे, पाकिस्तानी अधिकारी दानिशशी संबंध आणि खर्चाच्या फंडिंगबाबत विचारणा केली, मात्र ज्योतीने या प्रश्नांना कोणतेही समाधानकारक उत्तर दिलेले नाही. तपास यंत्रणांनी तिला पाकिस्तानमध्ये थांबण्याचा आणि फिरण्याचा खर्च कोण करत होते, असे विचारले असता, पाकिस्तान दूतावासातर्फे सोशल मीडिया इन्फ्लुएंसरना प्रवासासाठी बोलावले जात होते, असे तिने म्हटले आहे.
Title: Jyoti Malhotra One Dinner Changed Everything; Shocking Information in Police Investigation






