Jeevan Ghogre Kidnapping | राज्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी घटनांमध्ये चिंताजनक वाढ पाहायला मिळत आहे. हत्या, मारहाण आणि चोरीसारख्या घटनांच्या मालिकेत आता आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या एका वरिष्ठ नेत्याचं अपहरण करून त्यांना बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना उघडकीस आली असून, यामुळे नांदेडसह संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे.
ही घटना नगरातील राजकीय वर्तुळात मोठी चर्चा ठरली असून, संबंधित प्रकरणाचा व्हिडीओही समोर आला आहे. मारहाणीनंतर संबंधित नेत्याची सुटका करण्यात आल्याची माहिती असून, या घटनेमागचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.
नांदेडमध्ये थरारक घटना, नेते गंभीर जखमी :
समोर आलेल्या माहितीनुसार, नांदेडमधील सिडको परिसरात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस जीवन घोगरे पाटील यांचं अपहरण करण्यात आलं. आज सकाळी सुमारे साडेअकराच्या सुमारास चारचाकी वाहनातून आलेल्या काही अज्ञात व्यक्तींनी त्यांना जबरदस्तीने गाडीत बसवून नेल्याचं सांगितलं जात आहे.
अपहरणानंतर जीवन घोगरे यांना बेदम मारहाण करण्यात आली असून, या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले आहेत. काही वेळानंतर त्यांची सुटका करण्यात आली. सध्या त्यांच्या प्रकृतीबाबत अधिकृत माहिती आली नाही.
Jeevan Ghogre Kidnapping | CCTV व्हिडीओ समोर, पोलिस तपास सुरू :
ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, व्हिडीओमध्ये घटनास्थळी उभी असलेली कार आणि त्यानंतर वेगात निघून गेलेलं वाहन स्पष्टपणे दिसत आहे. याच गाडीतून जीवन घोगरे यांचं अपहरण झाल्याचं व्हिडीओतून समोर येत आहे.
दरम्यान, या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, पोलीस अधिक तपास करत आहेत. अपहरणामागील नेमकं कारण, हल्लेखोर कोण होते आणि त्यामागे कोणता उद्देश होता, याचा शोध घेतला जात आहे. या घटनेमुळे नांदेडसह राज्यातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.






