Jayant Patil | आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. मतदार यादीतील त्रुटी आणि तांत्रिक बाबींवरून विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांनी तर थेट दावा केला आहे की, “महाराष्ट्र निवडणूक आयोगाचा सर्व्हर कुणीतरी दुसरं चालवतंय, आम्हाला संशय आहे.” या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. (Maharashtra election server issue)
महाविकास आघाडीच्या (MVA) प्रमुख नेत्यांनी बुधवारी राज्य निवडणूक आयोगाची भेट घेतली. या बैठकीत उद्धव ठाकरे, राज ठाकरे, बाळासाहेब थोरात यांच्यासह आघाडीतील अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते. मतदार यादीतील चुकीच्या नोंदी, पत्ते आणि फोटोसंबंधी गोंधळांबाबत त्यांनी आक्षेप नोंदवले.
मतदार यादीत गंभीर त्रुटी असल्याचा आरोप :
जयंत पाटील (Jayant Patil) यांनी सांगितले की, “आम्ही काही महत्त्वाचे पुरावे राज्य निवडणूक आयोगाला दाखवले असून, त्यासोबत सविस्तर पत्रही सादर केले आहे. मतदार यादीत मोठ्या प्रमाणावर चुकीचे मुद्दे समाविष्ट झाले आहेत. काही नागरिक पत्त्यांवर राहतच नाहीत, तरी त्यांची नावे यादीत दिसत आहेत,” असा दावा त्यांनी केला.
त्यांनी पुढे उदाहरण देताना सांगितले की, मुरबाड मतदारसंघात त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्रुटी दाखवली असता एका महिलांचे नाव अचानक यादीतून काढण्यात आले. “आमचा प्रश्न आहे की ही नावं कोणी काढली? कोणत्या अधिकाऱ्याने स्थळ पाहणी केली? हीच ती व्यक्ती आहे का याची पडताळणी कोणी केली?” असे प्रश्न पाटील यांनी उपस्थित केले.
Jayant Patil | “राज्य व केंद्र आयोगाच्या हातात काही नाही” – जयंत पाटील :
या सर्व घटनांवरून “राज्य आणि केंद्र निवडणूक आयोगाच्या हातात काही नाही”, असा गंभीर आरोप जयंत पाटील यांनी केला. “ही प्रणाली कोणाच्या नियंत्रणात आहे, याबाबत शंका निर्माण होते. निवडणूक आयोगाचा सर्व्हर बाहेरील कोणी तरी चालवत आहे, असे दिसते,” असे ते म्हणाले.
त्यांनी स्पष्ट केले की, “गेल्या विधानसभा निवडणुकीतही सिस्टिम मोडून काढण्यात आली होती. मतदानाचे टक्केवारी आकडे जाहीर करण्यात आले नाहीत. जर आता ह्याच मतदार याद्या वापरल्या जात असतील, तर तीच चूक पुन्हा होईल,” अशी भीती त्यांनी व्यक्त केली. (Maharashtra election server issue)
विरोधकांकडून कारवाईची मागणी :
महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून, मतदार यादीतील चुका दुरुस्त करण्याची मागणी केली आहे.
त्यांनी राज्य निवडणूक आयोगाला निवेदन देऊन सर्व्हरची तांत्रिक पडताळणी करण्याचीही मागणी केली आहे. आगामी निवडणुकीपूर्वी मतदार यादीतील पारदर्शकता राखली गेली नाही, तर आंदोलन उभारण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.






