Jayant Patil | राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन गटांच्या संभाव्य एकत्रीकरणाबाबत सुरू असलेल्या चर्चांना आता स्पष्ट दिशा मिळाली आहे. अजित पवार (Ajit Pawar) यांच्या निधनानंतर या विषयावर विविध तर्क-वितर्क लावले जात होते. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि आमदार जयंत पाटील (Jayant Patil) यांनी ठाम भूमिका मांडत विलीनीकरणाच्या चर्चेवर पडदा टाकला आहे.
विलीनीकरणाची चर्चा थांबली :
राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट (NCP Ajit Pawar) आणि शरद पवार (Sharad Pawar) यांच्या नेतृत्वाखालील गट पुन्हा एकत्र येणार का, याबाबत राजकीय वर्तुळात हालचाली सुरू होत्या. विशेषतः अजित पवार यांच्या विमान अपघातातील मृत्यूनंतर या चर्चांना अधिकच वेग आला होता. दोन्ही गटांतील काही नेत्यांच्या बैठका झाल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. काहींनी तर अजित पवार यांची दोन्ही गटांना पुन्हा एकत्र आणण्याची इच्छा होती, असेही म्हटले होते. मात्र अजित पवार गटाकडून किंवा नव्या अध्यक्षा सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्याकडून अधिकृत भूमिका स्पष्ट करण्यात आली नव्हती.
या पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांनी स्पष्ट केले की, विलीनीकरणाची चर्चा आता पूर्णपणे थांबली आहे. ज्यांच्यासोबत या संदर्भात संवाद सुरू होता ते नेते आता हयात नाहीत, त्यामुळे सध्यातरी दोन्ही पक्षांचे एकत्रीकरण होणार नाही. अजित पवार यांच्या पुढाकारातून ही प्रक्रिया सुरू झाली होती; मात्र त्यांच्या अनुपस्थितीत पुढील हालचाली होणार नसल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. त्यांच्या वक्तव्यामुळे या विषयावरील अटकळींना आळा बसल्याचे मानले जात आहे.
Jayant Patil | राज्यसभा आणि महाविकास आघाडीची भूमिका :
याचवेळी जयंत पाटील यांनी राज्यसभेच्या जागेबाबतही भूमिका मांडली. त्यांनी सांगितले की, अलीकडेच त्यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेतली. पक्षातील बहुतेक नेत्यांची इच्छा आहे की शरद पवार यांनी दिल्लीत जाऊन राज्यसभेवर प्रतिनिधित्व करावे. या संदर्भात काँग्रेस (Congress) आणि ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत चर्चा सुरू असून अंतिम निर्णय महाविकास आघाडी (MVA) एकत्रितपणे घेईल.
आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी अद्याप कोणताही निर्णय झालेला नसल्याचे म्हटले असून त्यांचे मत योग्य असल्याचेही जयंत पाटील यांनी नमूद केले. राज्यसभेच्या उमेदवारीबाबत सर्व घटक पक्षांमध्ये समन्वय साधूनच निर्णय घेतला जाईल, असे संकेत त्यांनी दिले. त्यामुळे विलीनीकरणाचा विषय मागे पडला असला तरी राज्यसभेच्या राजकारणावर पुढील काही दिवसांत महत्त्वाच्या घडामोडी होण्याची शक्यता आहे.






