Jaswinder Bhalla Passes Away | पंजाबी चित्रपटसृष्टीतील दिग्गज कॉमेडियन आणि अभिनेते जसविंदर भल्ला यांचं आज निधन झालं. वयाच्या 65 व्या वर्षी त्यांनी मोहालीतील फोर्टिज रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावत होती. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने चाहत्यांमध्ये आणि संपूर्ण पंजाबी फिल्म इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. (Jaswinder Bhalla Passes Away)
जसविंदर भल्ला यांनी गेल्या तीन दशकांत पंजाबी सिनेमाला विनोदाची नवी उंची दिली. त्यांच्या टायमिंगवर आधारित साधे पण व्यंगपूर्ण संवाद प्रेक्षकांना नेहमीच खळखळून हसायला लावत. ‘गड्डी चलती है छलांग मार के’, ‘कॅरी ऑन जट्ट’, ‘जिंद जान’, ‘बँड बाजे’ अशा चित्रपटांमधील त्यांच्या अभिनयाने ते घराघरात पोहोचले.
अविस्मरणीय कारकीर्द :
जसविंदर यांचा जन्म 4 मे 1960 रोजी लुधियानातील दोराहा येथे झाला. ते व्यवसायाने प्राध्यापक होते. 1988 मध्ये ‘छनकटा 88’ या चित्रपटातून त्यांनी कारकीर्दीला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी ‘दुल्हा भट्टी’, ‘जट्ट अँड ज्युलिएट’, ‘सरदारजी’ यांसारख्या हिट चित्रपटांतून आपली वेगळी छाप सोडली. विशेषतः ‘कॅरी ऑन जट्टा’ मालिकेत त्यांनी साकारलेली अॅडव्होकेट ढिल्लनची भूमिका प्रेक्षकांच्या कायम लक्षात राहील.
चित्रपटातील छोट्या भूमिकाही त्यांनी प्रभावी केल्या. 2024 मध्ये ‘शिंदा शिंदा नो पापा’ या चित्रपटात त्यांनी शेवटचा अभिनय केला होता. यात गिप्पी गरेवाल आणि हिना खान यांच्या मुख्य भूमिका होत्या.
Jaswinder Bhalla Passes Away | वैयक्तिक आयुष्य :
जसविंदर भल्ला यांनी चंदीगडमधील ललित कला शिक्षिका परमदीप यांच्याशी लग्न केले होते. त्यांचा मुलगा पुखराज भल्ला सुरुवातीला इंजिनिअर होता, पण नंतर वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत अभिनयाकडे वळला. आज तोही पंजाबी चित्रपटसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण करत आहे. (Jaswinder Bhalla Passes Away)
मिळालेल्या माहितीनुसार, जसविंदर भल्ला यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार 23 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता मोहालीतील बलंगी स्मशानभूमीत होणार आहेत. त्यांच्या जाण्याने विनोदी सिनेमाच्या जगतात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.






