Beed News | बीड (Beed) येथे पार पडलेल्या ओबीसी महाएल्गार मेळाव्याने राजकीय वातावरण तापले आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी मेळाव्यातून दिलेल्या इशाऱ्यानंतर, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी भुजबळांवर हल्लाबोल करत, हा मेळावा केवळ राजकीय स्वार्थासाठी आणि दहशत पसरवण्यासाठी असल्याचा आरोप केला आहे.
जरांगेंचा भुजबळांवर थेट निशाणा :
मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांचा “भुरटा नेता” असा उल्लेख करत त्यांच्यावर पलटवार केला. बीड (Beed) जिल्ह्यावर दहशत निर्माण करणे आणि आपले राजकीय अस्तित्व टिकवणे, हीच भुजबळांची लढाई आहे, असा आरोप जरांगेंनी केला. या सभेला केवळ एका विशिष्ट जातीचे लोक जमवले होते, बाकी ओबीसी समाजाशी यांना काहीही देणेघेणे नाही.
भुजबळांची खरी क्षमता आता आमच्या लक्षात आली आहे, असेही ते म्हणाले. “जीआर (GR) रद्द करण्याची खोड भुजबळांनी काढू नये. तुम्ही जर आमच्या मुळावर उठणार असाल आणि जीआर रद्द करण्यासाठी दहशत निर्माण करणार असाल, तर मराठा समाजालाही एकत्र येऊन तोडीस तोड उत्तर द्यावे लागेल. या पवित्र भूमीत दंगली घडवण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण होऊ देणार नाही,” असा सणसणीत इशारा जरांगेंनी दिला.
Beed News | भुजबळांचा ‘दरिद्री पाटील’ उल्लेख आणि आरक्षणावर भूमिका :
बीडच्या सभेत मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटलांवर सडकून टीका केली होती. “मराठा समाज आणि आमच्यात जे अंतर पडले, ते अंतरवलीच्या (Antarwali) त्या दरिद्री पाटलामुळे पडले आहे,” अशा शब्दात त्यांनी जरांगेंवर हल्ला चढवला. आरक्षण हा गरिबी हटावचा कार्यक्रम नसून ते सामाजिकदृष्ट्या मागासलेल्या लोकांसाठी आहे, असेही भुजबळ म्हणाले. आता गप्प बसणार नाही, ओबीसी आरक्षणासाठी कोर्टात आणि रस्त्यावर दुहेरी लढा लढू, असा इशाराही त्यांनी दिला.
दुसरीकडे, जरांगेंनी आश्चर्यकारकपणे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे कौतुक केले. “फडणवीस यांनी मराठ्यांचे मन जिंकले आहे. भुजबळांची औकात त्यांच्या लक्षात आली आहे,” असे ते म्हणाले. भुजबळांचा खरा उद्देश फडणवीस, विखे, शिंदे आणि अजितदादा (Ajit Dada) यांना बदनाम करणे हाच आहे, असा आरोपही त्यांनी केला. पवारांनी (Pawar) याला बाजूला करावे आणि अजित पवारांनी बीड जिल्ह्याचा कारभार दुसऱ्याच्या हातात द्यावा, अशी मागणीही जरांगेंनी केली.






