Jalgaon Crime News | महाराष्ट्रात दिवसेंदिवस कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर होताना दिसत आहे. गुन्हेगारी घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यातच आता जळगावमधून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. जळगाव शहरात मेहरूण येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कारानंतर एका वृद्ध महिलेच्या अस्थींची चोरी झाल्याची लाजिरवाणी घटना समोर आली आहे.
छबाबाई काशिनाथ पाटील (रा. गायत्री नगर, जळगाव) असे मृत महिलेचे नाव आहे. वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले होते. मृत्यूपूर्वी छबाबाई पाटील यांनी त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने काढू नये, अशी शेवटची इच्छा व्यक्त केली होती. कुटुंबीयांनी ती इच्छा पूर्ण केल्यामुळे, अंत्यसंस्कारादरम्यान ही हे दागिने तसेच होते. चोरट्यांनी याच संधीचा फायदा घेतला.
सोन्याच्या लालसेपोटी अस्थींची चोरी :
छबाबाई पाटील (Chababai Patil) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या इच्छेनुसार अंगावरील सोन्याचे दागिने तसेच ठेवण्यात आले होते. अंत्यसंस्कारावेळी हे सोने जळून अस्थींवर चिकटले असावे. त्यामुळे सोन्याच्या लालसेपोटी चोरट्यांनी स्मशानभूमीत येऊन मृत छबाबाई पाटील यांच्या डोके, पाय आणि हाताच्या अस्थींची चोरी केली, असा आरोप पाटील कुटुंबीयांनी केला आहे. या धक्कादायक घटनेमुळे जळगाव शहरात मोठी खळबळ माजली आहे. (Jalgaon Crime News)
अस्थी चोरीच्या या धक्कादायक प्रकारामुळे पाटील कुटुंबीयांनी महानगरपालिकेच्या सुरक्षा व्यवस्थेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आमदार सुरेश भोळे यांनीही महानगरपालिकेच्या कारभारावर ताशेरे ओढले. “मृत नागरिकांच्याही अस्थी सुरक्षित नाहीत, ही लाजिरवाणी बाब आहे,” अशा शब्दांत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे, तसेच, अशी घटना घडू नये यासाठी या ठिकाणी लाईट, सीसीटीव्ही कॅमेरे आणि वॉचमनची सोय करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
Jalgaon crime news | कुटुंबीयांची भावनिक मागणी :
या घटनेनंतर पाटील कुटुंबीयांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. “आमच्या आईवर अंत्यसंस्कार केल्यानंतर, जेव्हा आम्ही अस्थी नेण्यासाठी आलो होतो, तेव्हा इथे अस्थी नसल्याचे आमच्या लक्षात आले. डोक्याच्या, हाताच्या आणि पायाच्या अस्थी चोरीला गेल्या होत्या. याबाबत आम्ही तक्रार केली आहे. अस्थी परत मिळाव्या म्हणून आम्ही पोलीस तक्रारही देणार आहोत.
आम्हाला सोने नको, फक्त आमच्या आईच्या अस्थी परत करा,” अशी भावनिक मागणी पाटील कुटुंबीयांनी केली आहे. सध्या पोलीस या घटनेचा तपास करत असून, या अमानुष कृत्यामागे असलेल्या चोरट्यांचा शोध सुरू आहे. (Jalgaon Crime News)






