Ishant Sharma l आयपीएल 2025 मधील गुजरात टायटन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद (GT vs SRH) सामन्यात एक मोठा वाद निर्माण झाला. या सामन्यात गुजरातचा अनुभवी गोलंदाज ईशांत शर्मा याच्यावर IPL आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल मॅच फीच्या 25 टक्के रकमेचा दंड लावण्यात आला आहे. यासोबतच त्याच्या खात्यात एक डिमेरिट पॉईंट नोंदवण्यात आला आहे.
या सामन्यात ईशांत शर्माला एकही विकेट मिळाली नाही, मात्र मैदानावर त्याचं आक्रमक आणि गैरवर्तनाचं वर्तन चांगलंच चर्चेत आलं. आयपीएलच्या आचारसंहिता अनुच्छेद 2.2 नुसार, क्रिकेट वस्तू, फील्ड उपकरणे किंवा मैदानावरील वस्तूंना हेतुपुरस्सर नुकसान पोहोचवणं हा लेव्हल 1 प्रकारातील गुन्हा मानला जातो.
ईशांतने मान्य केली चूक; मॅच रेफरीचा निर्णय अंतिम :
सामन्यानंतर ईशांत शर्माने रेफरीद्वारे ठोठावलेली शिक्षा मान्य केली आहे. आयपीएल नियमानुसार लेव्हल 1 गुन्ह्यांमध्ये मॅच रेफरीचा निर्णय अंतिम असतो आणि खेळाडूंना त्यावर अपील करण्याची मुभा नसते. रागाच्या भरात केलेल्या कृतीमुळे ईशांतला आता पुढील सामन्यांमध्ये संयम बाळगण्याची गरज भासणार आहे.
आचारसंहिता 2.2 मध्ये अशा वर्तनांचा समावेश केला जातो ज्यात स्टंप्सला मारणं, जाहिरात बोर्ड, ड्रेसिंग रूम दरवाजे, बाउंड्री फेन्स यांना इजा पोहोचवणं यांचा समावेश होतो. अशाच कृतीसाठी ईशांत शर्मावर कारवाई करण्यात आली आहे.
Ishant Sharma l गुजरातचा तिसरा सलग विजय; पॉईंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानी :
या सामन्यात गुजरात टायटन्सने सनरायजर्स हैदराबादवर 7 विकेट्सने विजय मिळवला आणि लागोपाठ तिसरा सामना जिंकत पॉईंट्स टेबलमध्ये दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली. SRH ने 152 धावांची मजल मारली होती.
गुजरातच्या गोलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी केली. मोहम्मद सिराजने 4 ओव्हर्समध्ये केवळ 17 धावा देत 4 बळी घेतले आणि आपलं आयपीएलमधील सर्वोत्तम प्रदर्शन सादर केलं. त्यामुळे त्याला प्लेअर ऑफ द मॅच घोषित करण्यात आलं.








