Eknath Shinde | महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे. सातारा ड्रग्स प्रकरणावरून शिवसेना (ठाकरे गट) नेत्या सुषमा अंधारे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर गंभीर आरोप करत थेट राजीनाम्याची मागणी केली आहे. या प्रकरणामुळे राजकीय वातावरण तापले असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली आहे. अंधारे यांच्या आरोपांमुळे शिंदे गट अडचणीत आला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना, सातारा ड्रग्स प्रकरणातील आरोपींसाठी एकनाथ शिंदे यांच्या भावाच्या हॉटेलमधून जेवण मागवण्यात आल्याचा दावा केला आहे. ‘हॉटेल तेजयश’ हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बंधू प्रकाश शिंदे यांचे असल्याचा आरोप करत अंधारे यांनी या प्रकरणाचे कथित पुरावे सादर केले. या आरोपांमुळे सत्ताधारी गोटात एकच खळबळ उडाली आहे.
सुषमा अंधारे नेमकं काय म्हणाल्या? :
सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी यावेळी गुगल मॅप आणि व्हॉट्सअॅप लिंकचा थेट डेमो दाखवत आरोप अधिक तीव्र केले. त्या म्हणाल्या की, संबंधित रिसॉर्टची माहिती व्हॉट्सअॅपवर उपलब्ध असून ऑनलाइन बुकिंगवर क्लिक केल्यानंतर ‘प्रकाश शिंदे’ हे नाव स्पष्टपणे दिसत आहे. ‘हॉटेल तेजयश’ हे नाव त्यांच्या दोन्ही मुलांच्या नावावरून ठेवण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला. “आता यानंतरही प्रकाश शिंदे खोटं बोलणार का?” असा थेट सवाल अंधारे यांनी उपस्थित केला.
याचवेळी सुषमा अंधारे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी ठाम मागणी केली. जर एखादी व्यक्ती मंत्रिपदाच्या अधिकारांमुळे वाचत असेल, तर अशा परिस्थितीत त्या व्यक्तीचा राजीनामा घेतलाच पाहिजे, असं स्पष्ट मत त्यांनी मांडलं. विरोधक म्हणून प्रश्न विचारणं हा आमचा अधिकार असून, आम्ही ते करतच राहू, असंही अंधारे यांनी ठामपणे सांगितलं.
Eknath Shinde | शिंदे गटाचा पलटवार, कारवाईचा इशारा :
दरम्यान, सुषमा अंधारे यांच्या आरोपांवर शिवसेनेकडून (शिंदे गट) तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. मंत्री शंभुराज देसाई यांनी अंधारे यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत, हा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सनसनाटी निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न असल्याचा आरोप केला आहे. सध्या नगरपालिकांच्या आणि महापालिकांच्या निवडणुका सुरू असून, अशा काळात जाणीवपूर्वक बदनामी करण्याचा हा डाव असल्याचं देसाई यांनी म्हटलं.
याचवेळी शंभुराज देसाई यांनी सुषमा अंधारे यांनी माफी मागावी, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही दिला आहे. मात्र या इशाऱ्यानंतरही सुषमा अंधारे माघार घेण्याच्या भूमिकेत दिसत नाहीत. त्यांनी पलटवार करत, “मी पुरावे दिले आहेत, मग धमक्या का दिल्या जात आहेत?” असा सवाल उपस्थित केला. जिल्ह्याला गुन्हेगारीचा विळखा पडलेला असताना पालकमंत्री नेमकं काय करत आहेत, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
दरम्यान, या आरोप-प्रत्यारोपांमुळे सातारा ड्रग्स प्रकरणाला नवे राजकीय वळण मिळाले असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका काय असणार आणि या प्रकरणात पुढे कोणती कारवाई होते, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.






