IPL 2025 l इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2025 च्या 18 व्या हंगामाचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. स्पर्धेला 22 मार्चपासून सुरुवात होईल आणि अंतिम सामना 25 मे रोजी खेळवला जाईल. गतविजेता कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (Royal Challengers Bangalore) यांच्यात पहिला सामना होईल.
22 मार्च रोजी कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर (Eden Gardens) हा सामना खेळवला जाईल. या हंगामात गुवाहाटी, विशाखापट्टणम आणि धर्मशालासह एकूण 13 मैदानांवर सामने खेळवले जातील.
आयपीएलचे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर, बीसीसीआयच्या (BCCI) एका पोस्टमुळे सर्वांनाच आश्चर्य वाटले. या पोस्टमध्ये आयपीएल 2025 हा चेन्नई सुपर किंग्जचा (Chennai Super Kings) माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा (Mahendra Singh Dhoni) शेवटचा हंगाम असू शकतो, असे संकेत देण्यात आले आहेत.
बीसीसीआयची (BCCI) पोस्ट :
बीसीसीआयने (BCCI) ट्विटरवर (Twitter) लिहिले, “थला चेपॉक (Chepauk) मध्ये परत आला आहे! एम एस धोनीच्या (MS Dhoni) निरोपाच्या आयपीएल हंगामाची सुरुवात 23 मार्चला कट्टर प्रतिस्पर्धी मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्धच्या शानदार सामन्याने होणार आहे.
IPL 2025 मध्ये एक अविस्मरणीय अध्याय सुरू होईल – तुम्ही तयार आहात का?” धोनीने 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. तो भारताकडून शेवटचा सामना 2019 मध्ये खेळला होता. मात्र, त्यानंतरही तो आयपीएलमध्ये खेळत राहिला आणि त्याने संघाला विजेतेपद मिळवून दिले.
गेल्या काही वर्षांपासून धोनीच्या शेवटच्या हंगामाबद्दल चर्चा सुरू आहे. असे असतानाही, तो वयाच्या 43 व्या वर्षी पुन्हा आयपीएल खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. यावेळी चेन्नई सुपर किंग्जने धोनीला अनकॅप्ड खेळाडू म्हणून 4 कोटी रुपयांमध्ये कायम ठेवले. मेगा लिलावापूर्वी, बीसीसीआयने (BCCI) नियमांमध्ये बदल केले होते. त्यानुसार, भारताकडून पाच वर्षे आंतरराष्ट्रीय सामने न खेळलेल्या खेळाडूला अनकॅप्ड खेळाडू मानले जाईल. याचा फायदा घेत चेन्नईने धोनीला कमी किंमतीत रिटेन केले आहे.






