Post Office Saving Scheme | रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) रेपो दरात सलग दोन वेळा कपात केल्यानंतर बँकांनी त्यांच्या फिक्स्ड डिपॉझिटवरील (FD) व्याज दरात घट केली आहे. त्यामुळे, ज्येष्ठ नागरिक आणि कमी जोखमीचे गुंतवणूकदार अधिक चिंतेत आहेत. मात्र, अजूनही गुंतवणुकीचे चांगले पर्याय उपलब्ध आहेत. पोस्ट ऑफिसच्या (Post Office) काही बचत योजनांमध्ये ८.२% पर्यंत व्याज मिळत आहे, जे बँक एफडीपेक्षा जास्त आहे.
सुकन्या समृद्धी योजना आणि ज्येष्ठ नागरिक बचत योजना :
सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samriddhi Yojana) ही विशेषतः मुलींसाठी असून, यात दरवर्षी किमान २५० रुपये आणि कमाल १.५ लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते. या योजनेत सध्या ८.२०% दराने व्याज मिळत आहे. प्रत्येक मुलीसाठी एक खाते उघडण्याची परवानगी आहे आणि या गुंतवणुकीवर कलम ८०सी अंतर्गत कर सवलत देखील मिळते.
ज्येष्ठ नागरिक बचत योजना (Senior Citizen Savings Scheme) ही योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी असून, यात किमान १,००० रुपये आणि कमाल ३० लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते. या योजनेत देखील ८.२०% दराने व्याज दिले जात आहे. या योजनेचा कालावधी ५ वर्षे असून, गुंतवणुकीसाठी किमान वय ६० वर्षे असणे आवश्यक आहे. या योजनेत गुंतवलेल्या रकमेवर कलम ८०सी अंतर्गत आयकरमध्ये सूट मिळते.
पीपीएफ, किसान विकास पत्र आणि ५ वर्षांची एनएससी :
पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (Public Provident Fund – PPF) मध्ये दरवर्षी किमान ५०० रुपये आणि कमाल १.५ लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते. या योजनेत सध्या ७.१०% दराने व्याज मिळत आहे. गुंतवणुकीचा कालावधी १५ वर्षे असून, यावर कलम ८०सी अंतर्गत कर सवलत उपलब्ध आहे. किसान विकास पत्र (Kisan Vikas Patra) मध्ये किमान १,००० रुपयांची गुंतवणूक करता येते आणि कमाल गुंतवणुकीची कोणतीही मर्यादा नाही. यावर ७.५०% दराने व्याज मिळते आणि गुंतवणूक २.५ वर्षांनंतर काढता येते. यावर कोणताही कर लाभ मिळत नाही.
५ वर्षांच्या राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रात (5-Year NSC) किमान १,००० रुपयांची गुंतवणूक करता येते आणि कमाल मर्यादा नाही. यावर ७.७०% दराने व्याज मिळते आणि कलम ८०सी अंतर्गत कर लाभ मिळतो, तसेच टीडीएस (TDS) देखील लागत नाही.






