Nilesh Ghaywal | पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ (Nilesh Ghaywal) याच्याभोवती आता आंतरराष्ट्रीय स्तरावर फास आवळला जात आहे. पुणे पोलिसांच्या विनंतीनंतर इंटरपोलने त्याच्या विरोधात ‘ब्लू कॉर्नर’ नोटीस जारी केली आहे. यामुळे परदेशात पळून गेलेल्या घायवळचा शोध घेणे आणि त्याला भारतात परत आणण्याच्या प्रक्रियेला वेग मिळण्याची शक्यता आहे.
आंतरराष्ट्रीय पातळीवर गुन्हेगाराचा शोध
कोथरुड (Kothrud) येथील गोळीबार प्रकरणानंतर मुख्य आरोपी निलेश घायवळ देशाबाहेर पसार झाल्याचा संशय पोलिसांना आहे. त्याला भारतात आणण्यासाठी पुणे पोलिसांनी आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी पोलीस संघटना, अर्थात ‘इंटरपोल’ (Interpol) कडे मदतीसाठी पत्रव्यवहार केला होता. या विनंतीला प्रतिसाद देत इंटरपोलने घायवळ विरोधात ‘ब्लू कॉर्नर’ नोटीस (Blue Corner Notice) जारी केली आहे.
फौजदारी गुन्ह्यात सामील असलेल्या व्यक्तीची ओळख, ठावठिकाणा आणि इतर महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी ही नोटीस बजावली जाते. या नोटीसमुळे आता इंटरपोलच्या सदस्य देशांकडून घायवळ संबंधित माहिती मिळवणे पुणे पोलिसांना शक्य होणार आहे. यासोबतच त्याच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीसदेखील जारी करण्यात आली आहे, ज्यामुळे त्याच्या अटकेची प्रक्रिया अधिक सुलभ होईल.
Nilesh Ghaywal | घायवळ बंधूंवर पोलिसांचा फास
कीकडे निलेश घायवळचा आंतरराष्ट्रीय स्तरावर शोध सुरू असताना, दुसरीकडे त्याचा भाऊ सचिन घायवळवर (Sachin Ghaywal) कोथरुड गोळीबार प्रकरणी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) (MCOCA) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे पोलिसांनी या दोन्ही भावांचे पासपोर्ट रद्द करण्यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे, ज्यावर लवकरच सुनावणी अपेक्षित आहे. या टोळीवर आणखी गुन्हे दाखल होऊ शकतात, असे पोलीस उपायुक्त संभाजी कदम (Sambhaji Kadam) यांनी सांगितले आहे.
तपासादरम्यान एक धक्कादायक बाब समोर आली आहे. निलेशने ‘घायवळ’ ऐवजी ‘गायवळ’ असे नाव असलेली बनावट कागदपत्रे सादर करून पासपोर्ट मिळवला होता. चुकीच्या माहितीच्या आधारे आणि खोट्या कागदपत्रांच्या सहाय्याने पासपोर्ट मिळवणे हा एक गंभीर गुन्हा आहे.
या माहितीनंतर पुणे पोलिसांनी त्याचा पासपोर्ट रद्द करण्याची प्रक्रिया विशेष ‘मकोका’ न्यायालयाकडे सुरू केली आहे. १७ सप्टेंबर रोजी कोथरुडमधील मुठेश्वर चौकात रस्ता न दिल्याच्या क्षुल्लक कारणावरून घायवळ टोळीने एका तरुणावर गोळीबार केला होता, ज्यामुळे या सर्व कारवाईला सुरुवात झाली.






