Indian Railway | देशभरातील कोट्यवधी प्रवाशांसाठी रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. भारतीय रेल्वेने सर्व प्रवासी डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे रेल्वेमधील सुरक्षाव्यवस्था अधिक मजबूत होणार असून, प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी हा ऐतिहासिक टप्पा मानला जात आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि राज्यमंत्री रवनीत सिंह बिट्टू यांनी यासंदर्भात तांत्रिक आढावा घेतला.
देशभरातील अनेक रेल्वेमार्गांवर प्रायोगिक तत्त्वावर सीसीटीव्ही बसवण्यात आले होते. याचे सकारात्मक परिणाम दिसून आल्याने आता 74,000 डब्यांमध्ये आणि 15,000 रेल्वे इंजिनमध्ये सीसीटीव्ही बसवण्याला मंजुरी देण्यात आली आहे. (Indian Railway)
सुरक्षा आणि गोपनीयतेचा समतोल :
सीसीटीव्ही कॅमेरे फक्त सार्वजनिक वावरण्याच्या जागांमध्ये, म्हणजेच डब्यांच्या प्रवेशद्वाराजवळ बसवण्यात येणार आहेत. यामुळे प्रवाशांची गोपनीयता अबाधित ठेवली जाणार असून, असामाजिक घटकांवर नजर ठेवता येणार आहे. प्रत्येक डब्यामध्ये 4 डोम कॅमेरे बसवले जातील. एक पुढील बाजूस, एक मागील बाजूस आणि दोन्ही बाजूंना प्रत्येकी एक असे बसवले जाणार आहेत.
प्रत्येक इंजिनमध्ये 6 कॅमेरे, तसेच पुढील व मागील केबिनमध्ये 1 डोम कॅमेरा आणि 2 मायक्रोफोनही बसवले जातील. या सर्व यंत्रणा अत्याधुनिक आणि एसटीक्यूसी प्रमाणित असतील. (Indian Railway)
Indian Railway | उच्च दर्जाची तंत्रज्ञान वापरण्याचा निर्धार :
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले आहेत की, 100 किमी/तास वेगाने धावणाऱ्या गाड्यांमध्येही चित्रीकरण स्पष्ट आणि उच्च दर्जाचं असावं. तसेच कमी प्रकाशातही दृश्य स्पष्ट दिसेल याची खात्री केली जाणार आहे.
इतकंच नव्हे तर, India AI Mission अंतर्गत या सीसीटीव्ही फुटेजवर कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) वापरून संशयास्पद हालचालींचा वेगाने मागोवा घेण्याच्या शक्यताही तपासल्या जाणार आहेत.
उत्तर रेल्वेमध्ये यशस्वी चाचणी :
उत्तर रेल्वेच्या काही इंजिन आणि डब्यांमध्ये यापूर्वीच चाचण्या करण्यात आल्या असून, त्याचा अनुभव अत्यंत सकारात्मक आला आहे. या चाचण्यांमुळे रेल्वेच्या सुरक्षेच्या पातळीवर लक्षणीय सुधारणा झाल्याचं रेल्वे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे.
रेल्वे प्रशासनाच्या मते, हे कॅमेरे लावल्याने चोरी, छेडछाड, गोंधळ घालणे अशा असामाजिक वर्तनाला आळा बसेल, तसेच कोणत्याही घटनेनंतर तपास प्रक्रियेसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल.






