रेल्वे प्रवाशांसाठी अत्यंत महत्वाची बातमी! नवा नियम लागू

On: February 8, 2026 2:17 PM
Indian Railways
---Advertisement---

Indian Railways | रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी (Indian Railways) आता निष्काळजीपणा महागात पडू शकतो. रेल्वे बोर्डाने (Railway Board) आरक्षित तिकिटांवर प्रवास करताना ओळखपत्र सोबत ठेवणे अनिवार्य करणारा नवा नियम लागू केला आहे. या नियमांचे उल्लंघन केल्यास संपूर्ण गटावर दंड होण्याची शक्यता असल्याने प्रवाशांनी प्रवासापूर्वी विशेष खबरदारी घेणे गरजेचे ठरणार आहे.

एका PNRवरील सर्व प्रवाशांवर होणार कारवाई :

रेल्वे बोर्डाच्या नव्या सूचनेनुसार, आरक्षित श्रेणीतील म्हणजेच स्लीपर आणि एसी कोचमध्ये एका PNRवर प्रवास करणाऱ्या सहा प्रवाशांपैकी किमान एका व्यक्तीकडे मूळ ओळखपत्र असणे बंधनकारक करण्यात आले आहे. तिकीट तपासणीच्या वेळी ही अट पूर्ण न झाल्यास संपूर्ण गटाला विनातिकीट प्रवासी समजले जाईल आणि त्यानुसार दंड आकारण्यात येणार आहे. त्यामुळे एका प्रवाशाच्या दुर्लक्षामुळे सर्वांना आर्थिक फटका बसू शकतो.

हा नियम देशभरातील सर्व रेल्वे झोनमध्ये तत्काळ लागू करण्यात आला असून, टीटीई/टीसी (TTE/TC) यांना त्याची कठोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. लांब पल्ल्याच्या गाड्या, मेल-एक्सप्रेस गाड्या तसेच आरक्षित डब्यांमध्ये प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांना ही अट पाळावी लागणार आहे. पुणे रेल्वे विभाग (Pune Railway Division) यासह सर्व विभागांना याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.

Indian Railways | कोणती ओळखपत्रे ग्राह्य आणि नियमामागील कारण :

तिकीट तपासणीदरम्यान प्रवाशांपैकी किमान एका व्यक्तीने मूळ स्वरूपातील ओळखपत्र सादर करणे आवश्यक राहणार आहे. आधारकार्ड (Aadhaar Card), मतदान ओळखपत्र (Voter ID), पासपोर्ट (Passport), पॅनकार्ड (PAN Card), ड्रायव्हिंग लायसन्स (Driving Licence), शासकीय किंवा नोकरीचे ओळखपत्र तसेच शिष्यवृत्ती ओळखपत्र यापैकी कोणतेही एक मूळ स्वरूपात मान्य केले जाईल. मात्र, फोटोकॉपी किंवा मोबाईलवरील डिजिटल प्रत ग्राह्य धरली जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार, तिकीट दलाल, बनावट तिकिटे आणि अनधिकृत प्रवाशांवर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच प्रवाशांची ओळख निश्चित करण्यासाठी हा नियम लागू करण्यात आला आहे. प्रवास अधिक सुरक्षित आणि पारदर्शक करण्याच्या दृष्टीने ही पायरी महत्त्वाची असल्याचे रेल्वे सूत्रांनी सांगितले आहे. पुणे रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी हेमंत कुमार बेहरा (Hemant Kumar Behra) यांनीही सर्व प्रवाशांना प्रवासापूर्वी वैध ओळखपत्र सोबत ठेवण्याचे आवाहन केले आहे.

News Title: Indian Railways ID Rule Update

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now