Ration Card | केंद्र सरकार (Central Government) रेशन कार्ड धारकांसाठी एक ऐतिहासिक निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. हा बदल विशेषतः ‘अंत्योदय अन्न योजने’च्या (Antyodaya Anna Yojana) लाभार्थ्यांवर परिणाम करेल. धान्य वाटपातील विषमता संपवण्यासाठी हा नवा नियम आणला जात असून, यामुळे काही कुटुंबांना फायदा तर काहींना तोटा सहन करावा लागू शकतो.
सध्याची ‘प्रति कुटुंब’ धान्य पद्धत :
सध्या, अंत्योदय रेशन कार्ड (Antyodaya Ration Card) असलेल्या कुटुंबांना प्रति कुटुंब ३५ किलो धान्य दिले जाते. या नियमात कुटुंबातील सदस्यांची संख्या विचारात घेतली जात नाही. त्यामुळे, एका कुटुंबात दोनच सदस्य असले तरी त्यांना ३५ किलो धान्य मिळते आणि त्याच कुटुंबात सात किंवा अधिक सदस्य असले तरीही त्यांना तेवढेच धान्य दिले जाते.
ही असमान वितरण पद्धत अनेक कुटुंबांवर अन्याय करणारी ठरत आहे. ज्या कुटुंबात सदस्य संख्या कमी आहे, त्यांना गरजेपेक्षा जास्त धान्य मिळते, तर दुसरीकडे मोठ्या कुटुंबांना मिळणारे ३५ किलो धान्य अपुरे पडते. हीच विषमता दूर करण्यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत (National Food Security Act) नियमांमध्ये बदल करण्याची तयारी सुरू केली आहे.
Ration Card | नवा नियम: ‘प्रति व्यक्ती’ ७.५ किलो धान्य :
केंद्रीय अन्न मंत्रालयाच्या (Central Food Ministry) अहवालानुसार, आता ‘प्रति कुटुंब’ ऐवजी ‘प्रति व्यक्ती’ धान्य वाटप केले जाईल. नव्या प्रस्तावानुसार, अंत्योदय योजनेतील प्रत्येक सदस्याला ७.५ किलो धान्य मिळेल. सामान्य रेशन कार्डधारकांना (5 किलो) मिळणाऱ्या धान्यापेक्षा हे प्रमाण जास्त असेल. ही नवीन प्रणाली पुढील वर्षाच्या मार्च महिन्यापर्यंत (March 2026) देशभरात लागू होण्याची शक्यता आहे.
या बदलाचा थेट परिणाम देशातील १.७१ कोटी अंत्योदय कार्डधारकांवर होईल. नवीन सूत्रानुसार, ज्या कुटुंबांमध्ये चार किंवा त्यापेक्षा कमी सदस्य आहेत, त्यांना सध्याच्या ३५ किलोपेक्षा कमी धान्य मिळेल. मात्र, ज्या कुटुंबांमध्ये पाच किंवा अधिक सदस्य आहेत, त्यांना नव्या नियमामुळे जास्त धान्याचा लाभ मिळेल. सरकारच्या मते, यामुळे धान्याची बचत होईल आणि ते खऱ्या गरजूंपर्यंत पोहोचवणे शक्य होईल.






