Ind vs Pak | काल २८ सप्टेंबर रोजी दुबईमध्ये आशिया कप २०२५ चा अंतिम सामना रंगला. या सामन्यात भारतीय संघाने पुन्हा एकदा आपली ताकद दाखवत पाकिस्तानवर ५ विकेट्सने मात केली आणि विक्रमी विजयाचा किताब आपल्या नावे केला. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने संपूर्ण स्पर्धेत एकही सामना न गमावता विजेतेपद पटकावले.
तिलक वर्माच्या (Tilak Varma) दमदार खेळीने भारताला विजयाच्या दिशेने नेले तर, अखेरच्या चेंडूवर रिंकू सिंगच्या (Rinku Singh) चौकाराने विजयावर शिक्कामोर्तब केला. विजयानंतर संघाचा ट्रॉफी स्वीकारण्याचा आणि पारितोषिक वितरण समारंभाचा सोहळा पार पडतो. मात्र, यावेळी भारतीय खेळाडूंनी आशिया क्रिकेट परिषद (ACC) आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) चे प्रमुख मोहसीन नक्वी यांच्या हातून ट्रॉफी स्वीकारण्यास ठाम नकार दिला. नक्वी हे पाकिस्तान सरकारमध्ये मंत्री आहेत आणि त्यांनी पूर्वी भारत आणि भारतीय संघाविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे खेळाडूंनी त्यांच्याकडून सन्मान स्वीकारण्यास नकार दिला.
टीम इंडियाचा ठाम निर्णय आणि मैदानावरील जल्लोष :
भारतीय संघाच्या निर्णयामुळे पारितोषिक वितरण समारंभ तब्बल सव्वा तास उशिरा सुरू झाला. मोसिन नक्वी यांनी ACC अध्यक्ष म्हणून ट्रॉफी देण्याचा अधिकार स्वतःकडे असल्याचे सांगत भूमिका कायम ठेवली. मात्र, भारतीय संघाने ना ट्रॉफी स्वीकारली ना विजेतेपदाची पदके घेतली. पाकिस्तानच्या खेळाडूंनी मात्र आपापली पदके घेतली, पण भारतीय खेळाडू मैदानातच राहिले.
शेवटी समारंभ ट्रॉफी शिवाय पार पडला. समलोचक सायमन डूल यांनीही जाहीर केले की टीम इंडिया आज ट्रॉफी स्वीकारणार नाही. त्यानंतर मोहसीन नक्वी आणि सगळे अधिकारी मंच सोडून निघून गेले आणि लगेचच भारतीय खेळाडू मैदानात आले. ट्रॉफी नसतानाही त्यांनी जल्लोष केला, एकमेकांना अभिनंदन केले आणि ट्रॉफी उचलण्याचा अभिनय करत फोटोसेशनही केले.
Suryakumar Yadav recreates Rohit Sharma’s iconic 2024 T20 World Cup celebration after Asia Cup win.🇮🇳🔥 #INDvPAK pic.twitter.com/Y8rJzgNvEX
— 𝐑𝐮𝐬𝐡𝐢𝐢𝐢⁴⁵ (@rushiii_12) September 28, 2025
Ind vs Pak | ट्रॉफी न स्वीकारता भारतीय संघाने विजय साजरा केला :
पाकिस्तानी खेळाडू मात्र हे सगळे दृश्य ड्रेसिंग रूम मधून पाहत राहिले. त्यांच्या चेहऱ्यावर निराशा आणि आश्चर्य दोन्ही स्पष्ट दिसत होते. या घटनेने केवळ सामन्याच्या निकालावरच नव्हे तर क्रिकेटमधील सन्मान आणि मूल्यांवरही मोठी चर्चा सुरू झाली. भारतीय संघाने दाखवून दिले की विजय फक्त ट्रॉफी मिळवण्यात नसतो, तर आपल्या तत्त्वांवर ठाम राहण्यातही असतो.
आशिया कप २०२५ अंतिम सामन्यातील हा प्रसंग भारतीय क्रिकेटच्या इतिहासात वेगळ्या पद्धतीने नोंदवला जाईल. ट्रॉफी न स्वीकारता भारतीय संघाने विजय साजरा केला आणि जगाला सन्मान, एकता आणि अभिमानाचा धडा शिकवला.






