Amitabh Bachchan | ‘कौन बनेगा करोडपती’ (KBC) या लोकप्रिय शोमध्ये सुपरस्टार अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्यासोबत एका स्पर्धकाने गैरवर्तन केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हॉट सीटवर बसलेल्या या स्पर्धकाच्या वागण्यामुळे अनेक प्रेक्षकांनी संताप व्यक्त केला आहे.
नेमके काय घडले? :
‘कौन बनेगा करोडपती १७’ (KBC 17) च्या लेटेस्ट एपिसोडमध्ये गुजरात राज्यातील मयंक नावाचा एक स्पर्धक हॉट सीटवर आला होता. तो खूप उत्साही दिसत होता. पण याच उत्साहाच्या भरात त्याने अमिताभ बच्चन यांच्यासोबत चुकीचे वर्तन केले. जेव्हा बिग बींनी त्याला त्याचे अनुभव विचारले, तेव्हा त्याने ‘आपण सरळ मुद्द्यावर येऊ’ असे बोलून त्यांना मध्येच थांबवले.
खेळ सुरू झाल्यावर मयंकने अमिताभ बच्चन यांना प्रश्न पूर्ण वाचू दिला नाही. प्रश्नाचे पर्याय देण्यापूर्वीच तो वारंवार ‘पर्याय देऊ नका… तुम्ही फक्त उत्तर लॉक करा’ असे म्हणत होता. तो सतत अमिताभ बच्चन यांना बोलू न देता मध्येच टोकत होता.
Amitabh Bachchan | एका महान कलाकारासोबत असे वागणे योग्य नाही :
पाचव्या प्रश्नाच्या वेळी तर तो ‘पर्याय द्या लवकर’ असे बोलला आणि कोणताही विचार न करता तिसरा पर्याय लॉक करण्यास सांगितले. विशेष म्हणजे त्याचे हे उत्तर चुकीचे ठरले. या संपूर्ण प्रकारात मयंककडून गैरवर्तन होत असतानाही अमिताभ बच्चन यांनी संयम राखला आणि चेहऱ्यावर स्मित ठेवून गेम पुढे नेण्याचा प्रयत्न केला.
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक प्रेक्षक मयंकच्या वागणुकीवर टीका करत आहेत. एका महान कलाकारासोबत असे वागणे योग्य नाही, तसेच मुलाला चांगले शिक्षण देण्यासोबतच संस्कार देणेही आवश्यक आहे, अशी प्रतिक्रिया लोक व्यक्त करत आहेत.






