Crime News | तमिळनाडूमधून एका खुनाची धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका महिलेने आपल्या पतीला विष देऊन त्याचा खून केला, कारण तो तिच्या आणि तिच्या प्रियकराच्या नात्यात अडथळा बनत होता. ती आपल्या पतीला सोडून प्रियकरासोबत राहू इच्छित होती, म्हणून तिने प्रियकराच्या मदतीने नवऱ्याचा काटा काढला.
बायकोचं नवऱ्यासोबत भयंकर कृत्य
ही घटना तमिळनाडूच्या धर्मपुरी जिल्ह्यातील अरूर येथील किराईपट्टी गावात घडली आहे. मृत पतीचे नाव रसूल (वय ३५) असे आहे, तर आरोपी महिलेचे नाव अम्मूबी आहे. पोलिसांनी आरोपी महिला आणि तिच्या प्रियकराला अटक करून तुरुंगात पाठवले आहे, जिथे त्यांच्यावर पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल.
रसूलचे काही वर्षांपूर्वी अम्मूबीशी लग्न झाले होते. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. रसूल एका खासगी कंपनीत ड्रायव्हर म्हणून काम करत होता आणि आपल्या कुटुंबाचा सांभाळ करत होता. अम्मूबी घरी राहून मुलांची काळजी घेत होती. त्यांचे आयुष्य अगदी सुखाने चालले होते, असे म्हटले जाते. याच दरम्यान तिच्या आयुष्यात लोकेश्वरन नावाच्या आणखी एका व्यक्तीचा प्रवेश झाला, ज्याच्याशी तिचे प्रेमसंबंध सुरू झाले, ज्यामुळे त्यांच्या वैवाहिक जीवनात कटुता निर्माण झाली.
काही दिवसांपूर्वी रसूलला अचानक उलट्या झाल्या आणि तो बेशुद्ध झाला. त्यानंतर कुटुंबीयांनी त्याला तातडीने रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार सुरू केले. यावेळी त्याच्या रक्ताच्या नमुन्यांची तपासणी केली असता त्यात कीटकनाशकाचे अवशेष आढळले, ज्यामुळे डॉक्टरांना संशय आला. डॉक्टरांनी ही बाब रसूलच्या कुटुंबीयांना सांगितली. हे सर्व जाणून रसूलचे कुटुंबीय थक्क झाले, कारण त्यांना यामागे काहीतरी अघटित घडल्याचा संशय आला.
प्रियकराच्या मदतीने नवऱ्याचा गेम
त्यांनी शंकेने अम्मूबीची चौकशी केली असता तिने काही निरर्थक गोष्टी सांगून विषय टाळण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर कुटुंबीयांनी तिच्या मोबाइलवरील व्हॉट्सॲप चॅट तपासली आणि त्यानंतर संपूर्ण कहाणी समोर आली. अम्मूबीने लोकेश्वरनच्या सांगण्यावरून रसूलला विष दिले असल्याचे या चॅटमधून स्पष्ट झाले. तिने प्रथम अननसाच्या रसात विष मिसळले होते, पण रसूलने तो पिला नाही. त्यानंतर तिने रसूलच्या खाण्याच्या सांभरमध्ये विष मिसळले, ज्यामुळे त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. कुटुंबीयांनी अम्मूबी आणि तिच्या प्रियकराविरुद्ध तातडीने तक्रार दाखल केली. कुटुंबाच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून शनिवारी अम्मूबी आणि लोकेश्वरनला अटक करून तुरुंगात पाठवले आहे.






