Hurricane Erin | अटलांटिक महासागरातून वेगाने सरकणारे ‘एरिन’ नावाचे महाचक्रीवादळ आता गंभीर टप्प्यावर पोहोचत आहे. हवामान खात्याने याबाबत हाय अलर्ट जारी केला असून, आजची रात्र विशेष धोक्याची ठरू शकते. शुक्रवारी रात्री 8 वाजता वादळातील वाऱ्यांचा वेग ताशी 85 किमी होता, जो रात्री 11 वाजेपर्यंत 100 किमी प्रति तास झाला. तज्ज्ञांचा अंदाज आहे की हा वेग 160 किमी प्रति तासापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे, ज्यामुळे किनारपट्टीवरील राज्यांसाठी ही मोठी चिंता निर्माण झाली आहे. (Hurricane Erin High Alert)
अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने येत्या सात दिवसांत किनारपट्टी भागात मुसळधार पाऊस आणि जोरदार वारे वाहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. समुद्रातील बदललेल्या वाऱ्यांच्या दिशा आणि वाढता वेग हे संभाव्य संकटाचे स्पष्ट संकेत आहेत.
चक्रीवादळाचा मार्ग आणि धोक्याची क्षेत्रे :
अमेरिकेच्या राष्ट्रीय चक्रीवादळ केंद्राच्या (NHC) माहितीनुसार, ‘एरिन’ रविवारपर्यंत अती तीव्र चक्रीवादळात रूपांतरित होऊ शकते. सध्या हे वादळ लीवर्ड बेटांच्या उत्तरेकडे सरकत असून, पुढील 24 तासांत अँगुइला, सेंट मार्टिन, सेंट बार्थेलेमी, साबा, सेंट युस्टाटियस आणि सिंट मार्टिन येथे उष्णकटिबंधीय वादळाची परिस्थिती निर्माण होण्याचा अंदाज आहे.
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, उत्तर लीवर्ड बेटे, व्हर्जिन बेटे आणि प्यूर्टो रिकोच्या जवळून हे वादळ जाण्याची शक्यता आहे. टर्क्स आणि कैकोस तसेच आग्नेय बहामास यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जरी हे वादळ सध्या दक्षिण फ्लोरिडापासून दूर असले तरी, फ्लोरिडापासून न्यू इंग्लंड आणि अटलांटिक कॅनडापर्यंतच्या किनारपट्टीवर उंच लाटा आणि धोकादायक रिप करंट्सचा धोका कायम आहे.
Hurricane Erin | प्यूर्टो रिकोवर वाढलेले संकट :
तज्ज्ञांच्या मते, प्यूर्टो रिकोच्या उत्तरेकडून जाताना ‘एरिन’ आणखी धोकादायक होऊ शकते. रविवारपर्यंत प्यूर्टो रिको आणि व्हर्जिन बेटांमध्ये ढगफुटीसारखा मुसळधार पाऊस, ताशी 50 किमीपेक्षा जास्त वेगाने वाहणारे वारे आणि भूस्खलनाचा धोका वाढू शकतो. या चक्रीवादळ हंगामात एकूण 18 वादळे येण्याची शक्यता असून, त्यापैकी 5 ते 9 तीव्र चक्रीवादळात रूपांतरित होऊ शकतात. (Hurricane Erin High Alert)
हवामान खात्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे, आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आणि विशेषतः किनारपट्टी भागातील लोकांनी स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे. सध्याच्या परिस्थितीत घराबाहेर अनावश्यकपणे न पडण्याचा आणि वादळाच्या हालचालींबाबत सतत अपडेट घेत राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.






