Rohit Arya | मुंबईच्या (Mumbai) पवई (Powai) परिसरात एका स्टुडिओत सुरू असलेले ओलीस नाट्य अखेर संपले आहे. वेब सिरीजच्या ऑडिशनच्या नावाखाली १७ मुले आणि एका वृद्ध महिलेला डांबून ठेवणारा आरोपी रोहित आर्य (Rohit Arya) हा पोलिसांच्या गोळीबारात ठार झाला आहे. पोलिसांनी अत्यंत धाडसी कारवाई करत सर्व ओलिसांची सुखरूप सुटका केली.
ऑडिशनच्या नावाखाली थरार
पवईतील ‘आरए स्टुडिओत’ (RA Studio) गेल्या सहा दिवसांपासून एका वेब सिरीजसाठी ऑडिशन सुरू होते. यासाठी राज्यातील विविध भागांतून मुलांना बोलावण्यात आले होते. आज ऑडिशनचा सातवा दिवस होता. रोज दुपारी जेवणासाठी बाहेर येणारी मुले आज बाहेर न आल्याने पालकांना चिंता वाटू लागली.
काही मुले स्टुडिओच्या खिडकीतून मदतीसाठी याचना करताना दिसल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. आरोपी रोहित आर्यने (Rohit Arya) स्वतः एक व्हिडिओ जारी करून मुलांना ओलीस ठेवल्याचे कबूल केले. त्याच्या काही मागण्या होत्या आणि “जर कोणी आत येण्याचा प्रयत्न केला तर मी स्टुडिओला आग लावून स्वतःला संपवेन,” अशी धमकीही त्याने दिली होती.
पोलिसांची धाडसी कारवाई, बाथरूममधून प्रवेश
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपीशी (Rohit Arya) वाटाघाटी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी इमारतीच्या मागच्या बाजूने, बाथरूमच्या खिडकीतून स्टुडिओमध्ये प्रवेश केला.
पोलीस आत शिरताच आरोपी रोहित आर्य आणि पोलिसांची झटापट झाली. रोहितने पोलिसांवर गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. त्याला प्रत्युत्तर म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल वाघमारे (API Amol Waghmare) यांनी स्वसंरक्षणासाठी गोळीबार केला. ही गोळी रोहितच्या छातीच्या डाव्या बाजूला लागली, ज्यात तो जमिनीवर कोसळला. पोलिसांनी तात्काळ सर्व १७ मुले आणि एका वृद्ध महिलेची सुखरूप सुटका केली.
रुग्णालयात मृत्यू-
घटनास्थळावरून एक एअरगन आणि काही रसायने जप्त करण्यात आली आहेत. जखमी आरोपीला पोलिसांनी व्हॅनमधून सेव्हन हिल्स रुग्णालयात (Seven Hills Hospital) दाखल केले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. एखाद्या बॉलिवूड चित्रपटालाही लाजवेल अशा या नाट्यमय घडामोडीने पवई परिसर हादरला आहे.






