Jyoti Malhotra | यूट्यूबर ज्योती मल्होत्राला हेरगिरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली असून, सध्या तिची कसून चौकशी सुरू आहे. या तपासात नवनवीन खुलासे होत आहेत. ज्योती ही भारत आणि पाकिस्तानमधील अनेक उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या संपर्कात होती, असे सांगितले जात आहे. आता, पाकिस्तानसाठी हेरगिरी करण्याच्या बदल्यात तिला नेमकी किती रक्कम मिळत होती, याबाबत उत्सुकता आहे.
पाकिस्तानला माहिती लीक
पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात कठोर पाऊले उचलली आहेत. भारतातील पाकिस्तानी नागरिकांना परत जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत, तसेच पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यांनाही पाकिस्तानात पाठवण्यात आले आहे. भारताची गुप्त माहिती पाकिस्तानात पोहोचू नये, यासाठी ही खबरदारी घेण्यात आली आहे. असे असूनही, ज्योती मल्होत्रा पाकिस्तानला गोपनीय माहिती पुरवत असल्याचे समोर आले आहे. ‘ट्रॅव्हल विथ जो’ या तिच्या लोकप्रिय यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून ती चांगली कमाई करत होती, मात्र आता तिच्यावर पाकिस्तानी गुप्तचर संस्थांना गोपनीय माहिती पुरवल्याचा गंभीर आरोप आहे.
मूळची हरियाणातील हिसारची असलेली ज्योती तिच्या यूट्यूब चॅनेलवर भारत आणि पाकिस्तानमधील पर्यटनस्थळांचे व्हिडिओ पोस्ट करायची. तिच्या चॅनेलला लाखो सब्सक्राइबर्स आहेत आणि सोशल मीडियाच्या माध्यमातूनही तिची चांगली कमाई होती. ती महिन्याला सुमारे दीड लाख रुपये कमावत होती, असे सांगितले जाते. मात्र, हेरगिरीच्या आरोपानंतर तिच्या प्रतिमेवर आणि कमाईवर नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे.
हेरगिरीच्या बदल्यात मोठी रक्कम?
तपासात असे समोर आले आहे की, ज्योती मल्होत्रा पाकिस्तानमध्ये अली अहवा, शाकीर आणि राणा शहाबाज यांना भेटली होती. तिने शाकीरचा नंबर ‘जट्ट रंधावा’ या नावाने सेव्ह केला होता आणि ती व्हॉट्सअॅप, स्नॅपचॅट आणि टेलिग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरून त्याच्या सतत संपर्कात होती.
हेरगिरीच्या बदल्यात ज्योतीने हवालाच्या माध्यमातून पैसे घेतल्याचाही आरोप आहे. या प्रकरणी ज्योतीसोबत गजाला, यामीन मोहम्मद दानीश, देविंदर सिंह ढिल्लो आणि अरमान यांसारख्या इतर काही लोकांनाही अटक करण्यात आली आहे. हे सर्व पाकिस्तानी गुप्तहेरांच्या संपर्कात होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ज्योती मल्होत्राला हेरगिरीच्या बदल्यात मोठी रक्कम मिळत होती, मात्र ही नेमकी किती होती, याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. याबाबतची अधिकृत माहिती लवकरच समोर येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Title: How Much Did Pakistan Pay Jyoti Malhotra for Espionage? Shocking Information Revealed!






