Dehu | जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा ३४० वा पालखी (Tukaram Maharaj Palkhi) सोहळा अगदी काही दिवसांवर येऊन ठेपला आहे आणि यासाठी देहू संस्थानने तयारीला जोर लावला आहे. या पार्श्वभूमीवर, यंदाच्या वर्षी संस्थानने एक महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. यावर्षी संत तुकाराम महाराजांच्या पालखी रथाला ओढण्यासाठी स्वतःच्या मालकीची, म्हणजेच संस्थानची बैलजोडी खरेदी केली जाणार आहे.
नवीन परंपरेची सुरुवात
परंपरागतपणे, तुकोबांच्या पादुका पंढरपूरला प्रस्थान करण्यासाठी पालखी रथात विराजमान झाल्यावर, हा रथ ओढण्याचा मान पुणे जिल्ह्यातील विविध भागांतील बैलजोड्यांना मिळत असे. दरवर्षी यासाठी अर्ज मागवले जात आणि निवड झालेल्या बैलजोड्या पालखी रथ ओढत असत. मात्र, यंदा देहू संस्थानने ही अनेक वर्षांची प्रथा बदलण्याचा निर्णय घेतला आहे. आता संस्थान स्वतः बैलजोडी खरेदी करणार असून, तीच बैलजोडी महाराजांच्या पालखी रथाला जुंपली जाणार आहे.
नितीन महाराजांचे वक्तव्य
या निर्णयाबद्दल बोलताना नितीन महाराज मोरे यांनी सांगितले की, यावर्षीपासून देहू संस्थान बाहेरून बैलजोडी न मागवता थेट संस्थानच्या मालकीची बैलजोडी खरेदी करून ती रथाला जोडण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे यावर्षी बैलजोडीसाठी अर्ज मागवले जाणार नाहीत, तर थेट संस्थानच्या मालकीची बैलजोडी तुकोबांचा पालखी रथ ओढणार आहे. जर हा प्रयोग यशस्वी झाला, तर हीच पद्धत पुढेही कायम ठेवण्याचा मानस असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पंढरपुरात विठ्ठल हे लाखो-करोडो लोकांचे श्रद्धास्थान आहे. आषाढी एकादशीनिमित्त वारकरी ‘ज्ञानबा तुकाराम’चा जयघोष करत हजारो मैल पायी प्रवास करतात. या दरम्यान, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक दिंड्या आणि पालख्या पंढरपूरच्या दिशेने निघतात.
संत शिरोमणी तुकाराम महाराज हे विठ्ठलाचे निष्ठावान भक्त होते. त्यामुळे विठुरायाच्या भेटीसाठी तुकाराम महाराजांची पालखी दरवर्षी मोठ्या उत्साहात प्रस्थान करते. या पालखीसाठी दरवर्षी बाहेरून बैलगाडी मागवण्याची जुनी परंपरा होती. परंतु आता देहू संस्थानने घेतलेल्या नवीन निर्णयामुळे गेल्या अनेक वर्षांपासून चालत आलेली बैलजोडी मागवण्याची प्रथा संपुष्टात येणार आहे. संत तुकाराम महाराज पालखी सोहळा काही आठवड्यांवर येऊन ठेपला असताना देहू संस्थानने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
Title: Historic Decision by Dehu Sansthan: Age-Old Tradition in Tukaram Maharaj Palkhi Procession to End






