Nitesh Rane | महायुती सरकारला सत्तेत आणण्यात हिंदू समाजाचा मोठा वाटा असल्यामुळे त्यांचे संरक्षण करणे ही आमची प्राथमिक जबाबदारी आहे, असे मत मत्स्य आणि बंदरे खात्याचे मंत्री नीतेश राणे यांनी व्यक्त केले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथे आयोजित रक्षाबंधन कार्यक्रमात ते बोलत होते. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.
नितेश राणेंचं वक्तव्य चर्चेत
या कार्यक्रमात नीतेश राणे म्हणाले की, राज्यातील महायुती सरकारला सत्तेत आणण्यासाठी हिंदू समाजाने पाठिंबा दिला. इतर धर्मीयांनी आम्हाला मतदान केले नाही. त्यामुळे हिंदू समाजाची सेवा आणि संरक्षण करणे हे आमचे कर्तव्य आहे. तुम्ही मोहल्ल्यांमध्ये फिरूनही त्यांचे मत मिळाले नाही, असा दावा त्यांनी केला.
नीतेश राणे यांनी महिलांच्या सुरक्षेवरही भर दिला. ते म्हणाले, केवळ विकास करून उपयोग नाही, कारण जर राज्यातील महिला सुरक्षित नसतील, तर त्या विकासाला काहीच अर्थ नाही. लव्ह जिहादसारख्या घटना घडत असताना हिंदुत्ववादी सरकारची गरज का आहे, हे लक्षात येते. लव्ह जिहादला आळा घालण्यासाठी हिंदुत्ववादी सरकार असणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
“हिंदुत्व अधिक भक्कम होईल”
रक्षाबंधन निमित्त आयोजित केलेल्या राखी संकलन उपक्रमाचे महत्त्व सांगताना राणे म्हणाले की, जिहादच्या नावाखाली आपल्या माता-भगिनींकडे वाकड्या नजरेने पाहिले जाते, त्याला राखी संकलन हे योग्य उत्तर आहे. या कार्यक्रमात १४ हजार राख्या संकलित करून त्या प्रत्येकापर्यंत पोहोचवल्या गेल्या. या उपक्रमामुळे हिंदुत्व अधिक भक्कम होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
लव्ह जिहादच्या वाढत्या घटनांवर भाष्य करताना राणे म्हणाले, रत्नागिरीसह गावागावात लव्ह जिहादचे प्रकार घडत आहेत. याला उत्तर देण्यासाठी हिंदू म्हणून आपण सर्वांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे. कोणीही आपल्या माता-भगिनींकडे वाकड्या नजरेने पाहिल्यास त्याला जागेवरच ठेवणार नाही, अशी भावना प्रत्येकाच्या मनात असायला हवी, असे त्यांनी म्हटले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने महिलांच्या संरक्षणासाठी घेतलेले निर्णय योग्य असल्याचेही त्यांनी सांगितले.






