Highway Robbery | महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी एक धोक्याची सूचना आहे. पुणे-सातारा, पुणे-नाशिक आणि पुणे-मुंबई यांसारख्या प्रमुख मार्गांवर लुटारूंनी एक नवीन शक्कल लढवली आहे. गाडी पंक्चर झाल्याचे खोटे सांगून वाहन थांबवून, शस्त्राचा धाक दाखवून प्रवाशांना लुटण्याचे प्रकार गेल्या काही महिन्यांत वाढले आहेत.
असा आहे लुटीचा नवा डाव :
महामार्गावर वेगाने जाणाऱ्या वाहनांचा लुटारू पाठलाग करतात. संधी न मिळाल्यास, ते चालकाला ‘तुमची गाडी पंक्चर झाली आहे’ असे सांगून भ्रमित करतात. अनेकदा वाहनचालक घाबरून किंवा अनवधानाने निर्जन ठिकाणी गाडी थांबवतात. हीच संधी साधून, हे चोरटे शस्त्राचा धाक दाखवून मौल्यवान ऐवज लुटून पसार होतात.
गेल्या महिन्यात पुणे (Pune) ते सातारा (Satara), पुणे (Pune) ते नाशिक (Nashik), पुणे (Pune) ते सोलापूर (Solapur) आणि पुणे (Pune) ते मुंबई (Mumbai) या सर्व प्रमुख महामार्गांवर अशा घटना घडल्या आहेत. रात्रीच्या वेळी थांबलेल्या गाड्यांना लुटण्याचे प्रकारही वाढले आहेत, जसे लोणावळ्यातील (Lonavala) एका पेट्रोल पंपावरील घटनेवरून दिसून आले आहे. त्यामुळे प्रवाशांनी अत्यंत सावधगिरी बाळगणे गरजेचे झाले आहे.
Highway Robbery | महामार्गावर प्रवास करताना ही काळजी घ्या :
रात्रीच्या वेळी शक्यतो एकट्याने प्रवास करणे टाळावे. प्रवासाला निघण्यापूर्वी आपल्या गाडीची स्थिती, विशेषतः टायरमधील हवा आणि इंधन, तपासून घेणे आवश्यक आहे. गाडीचे दोन्ही बाजूंचे टायर आतून एकदा तपासून घ्या. जर प्रवासादरम्यान कोणी अनोळखी व्यक्तीने गाडी पंक्चर झाल्याचे सांगितले, तर घाबरून गाडी निर्जनस्थळी थांबवू नका.
अशा परिस्थितीत, गाडी हळू चालवत पुढे न्या आणि एखाद्या सुरक्षित ठिकाणी, जसे की पेट्रोल पंप, हॉटेल किंवा जिथे लोकांची वर्दळ आहे, अशाच ठिकाणी वाहन थांबवा. जर कोणी पाठलाग करत असल्याचा संशय आला, तर तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा. अनोळखी व्यक्तीसोबत प्रवास करत असल्यास अधिक सावध रहा आणि थांबण्याची ठिकाणे सुरक्षित असल्याची खात्री करा.






