Health | चिकन अनेक खवय्यांच्या आवडीचा पदार्थ असला तरी, त्याचे अतिसेवन आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते, असे एका नवीन संशोधनातून समोर आले आहे. आठवड्यातून ३०० ग्रॅमपेक्षा जास्त चिकन खाल्ल्याने पचनसंस्थेशी संबंधित कर्करोगाचा धोका वाढतो, विशेषतः पुरुषांमध्ये मृत्यूचा धोका अधिक असल्याचे या अभ्यासात म्हटले आहे.
संशोधनातील निष्कर्ष
‘न्यूट्रिएंट्स’ या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनानुसार, आठवड्यात ३०० ग्रॅमपेक्षा जास्त पांढरे मांस (White Meat), ज्यात प्रामुख्याने चिकनचा समावेश होतो, सेवन करणाऱ्या व्यक्तींमध्ये मृत्यूदर आणि पचनसंस्थेच्या कर्करोगाने होणाऱ्या मृत्यूचा धोका लक्षणीयरीत्या वाढतो. अमेरिकेच्या २०२०-२५ साठीच्या आहाराविषयक मार्गदर्शक तत्त्वांमध्येही चिकन, टर्की, बदक यांचे सेवन कमी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
या अभ्यासात ४,००० हून अधिक व्यक्तींचा १९ वर्षांहून अधिक काळ मागोवा घेण्यात आला. अभ्यासात असे दिसून आले की, जे लोक आठवड्यात ३०० ग्रॅमपेक्षा जास्त चिकन खातात, त्यांच्यात १०० ग्रॅमपेक्षा कमी खाणाऱ्यांच्या तुलनेत एकूण मृत्यूदर २७% जास्त होता. पुरुषांमध्ये पचनसंस्थेच्या कर्करोगाने मृत्यू पावण्याचा धोका तर दुप्पट असल्याचे आढळले. १०० ग्रॅमपेक्षा जास्त चिकन खाणाऱ्यांमध्येही मृत्यूदराचा संबंध दिसून आला.
अभ्यासाच्या मर्यादा आणि काय काळजी घ्यावी?
अर्थात, या संशोधनाला काही मर्यादा आहेत. यात प्रक्रिया केलेले चिकन (Processed Chicken) आणि चिकन बनवण्याच्या पद्धतींचा (Cooking Methods) विचार केलेला नव्हता. तसेच, सहभागींच्या शारीरिक हालचालींची नोंद घेण्यात आली नव्हती, ज्यामुळे निष्कर्षांवर परिणाम होऊ शकतो.
तरीही, या अभ्यासातून अति चिकन सेवनाचे संभाव्य धोके समोर आले आहेत. त्यामुळे चिकन खाण्याचे प्रमाण मर्यादित ठेवणे आरोग्यासाठी महत्त्वाचे ठरू शकते. संतुलित आहार आणि निरोगी जीवनशैलीचा अवलंब करणे नेहमीच फायद्याचे ठरते.






