Hemant Dhome New Movie | मराठी चित्रपटसृष्टीत सामाजिक आशयाचे विषय घेऊन प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटवणारे दिग्दर्शक हेमंत ढोमे आता एका वेगळ्या विषयावर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. त्यांचा नवा चित्रपट ‘क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम’ लवकरच प्रदर्शित होणार असून अलिबाग येथे महिला व बालविकास मंत्री आदिती सुनील तटकरे (Aditi Tatkare) यांच्या हस्ते या चित्रपटाच्या चित्रीकरणाचा मुहूर्त सोहळा संपन्न झाला.
या वेळी दिग्दर्शक हेमंत ढोमे आणि निर्माती क्षिती जोग उपस्थित होत्या. मातृभाषेतून होणारे शिक्षण, त्याचे महत्त्व आणि मराठी शाळांची घटती संख्या यावर भाष्य करणारा हा चित्रपट प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडणार आहे. (Hemant Dhome New Movie)
आदिती तटकरे यांचे मनोगत :
मुहूर्त सोहळ्यानंतर बोलताना मंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare) म्हणाल्या, “आपल्या प्रत्येकाच्या जडणघडणीत शाळेचे मोठे योगदान असते. मातृभाषेतून मिळणारे शिक्षण विद्यार्थ्यांच्या संस्कारांवर खोलवर परिणाम करते. ‘क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम’ हा चित्रपट समाजाला योग्य संदेश देणारा आणि विचार करायला लावणारा ठरेल, यात शंका नाही. रायगड जिल्ह्यात या चित्रपटाचा मुहूर्त झाला, याचा मला विशेष अभिमान वाटतो.”
तटकरे यांनी पुढे सांगितले की, दिग्दर्शक हेमंत ढोमे आणि निर्माती क्षिती जोग यांचे चित्रपट नेहमीच समाजाचा आरसा दाखवणारे असतात. त्यांचा हा नवा प्रयत्न निश्चितच प्रेक्षकांच्या मनाला भिडणारा ठरेल.
View this post on Instagram
Hemant Dhome New Movie | हेमंत ढोमे यांचा मराठी शाळांवरील विशेष भर :
दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणाले, “आज मी जे काही आहे ते माझ्या मराठी शाळांमुळेच आहे. मातृभाषेत शिकताना मला माझी संस्कृती, परंपरा आणि माणसं समजली. पण आज मराठी शाळा दिवसेंदिवस कमी होत आहेत ही चिंतेची बाब आहे. या चित्रपटातून मातृभाषेतून होणारे शिक्षण कमीपणाचं नसून खऱ्या अर्थाने समृद्ध करणारं आहे, हे अधोरेखित करण्याचा प्रयत्न असेल.”
मुहूर्ताला आदिती तटकरे यांसारख्या समाजाभिमुख लोकप्रतिनिधींचा पाठिंबा मिळणे ही आनंदाची बाब असल्याचेही ढोमे यांनी सांगितले.
चित्रपटाबद्दल खास माहिती :
‘क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम’ या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन स्वतः हेमंत ढोमे यांनी केले असून, क्षिती जोग यांच्या चलचित्र मंडळी या बॅनरखाली चित्रपटाची निर्मिती होत आहे. (Hemant Dhome New Movie)
या चित्रपटात नेमके कोणते कलाकार झळकणार आहेत याबाबत अद्याप निर्मात्यांनी अधिकृत घोषणा केलेली नाही. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता अधिक वाढली आहे. मराठी शाळांचे महत्त्व, मातृभाषेतून होणारी जडणघडण आणि बदलत्या शिक्षण व्यवस्थेवर भाष्य करणारा हा चित्रपट समाजाला सकारात्मक संदेश देईल, अशी अपेक्षा आहे.






