Weather Update | गेल्या महिन्याभरापासून महाराष्ट्रासह देशातील अनेक भागात मुसळधार पावसाने थैमान घातले होते. पण आता पावसाने काहीसा पूर्णविराम घेतला आहे. मात्र, हा पूर्णविराम फार काळ टिकणार नाही असं दिसतंय. कारण बंगालच्या उपसागरावर पुन्हा एकदा चक्राकार वारे आणि नवीन हवामान प्रणाली निर्माण झाली आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत दक्षिण आणि ईशान्य भारतात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने याबाबत नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. (Maharashtra Weather Update)
मान्सूनची माघार; पुन्हा सक्रिय होणार हवामान :
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार सुरु झाली असली तरी देशभरातून मान्सुन परतण्यासाठी अजून काही दिवस लागणार आहेत. गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर मान्सूनची परतीची वाटचाल पुन्हा सुरु झाली आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, आणि महाराष्ट्राच्या काही भागातुन नैऋत्य मान्सून परतण्याची परिस्तिथी अनुकूल असल्याचे हवामान खात्याने सांगितले. त्यामुळे लवकरच ऑक्टोबर हिट जाणवण्याची शक्यता आहे.
तथापि, बंगालच्या उपसागरावर निर्माण झालेल्या प्रणालीमुळे हवामानात पुन्हा बदल होण्याची चिन्हं दिसत आहेत. ईशान्य मान्सून, म्हणजेच परतीचा पाऊस (Retreating Monsoon), लवकरच सुरू होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ही प्रणाली खूप तीव्र स्वरूपाची असल्याने दक्षिण भारतात गडगडाटी पावसासह वादळांची शक्यता वाढली आहे.
Weather Update | महाराष्ट्रात काय होणार?
हवामान खात्याच्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात नवीन चक्रीवादळ तयार होण्याचा इशारा देण्यात आला आहे. पुढील 48 तासांत हे चक्रीवादळ तीव्र होण्याची शक्यता आहे. या प्रणालीमुळे ओडिशा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि कर्नाटक या राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने (IMD) व्यक्त केला आहे.
गेल्या 24 तासांत तामिळनाडू आणि दक्षिण किनारी आंध्र प्रदेशातील काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला आहे. त्यामुळे हवामान विभागाने या राज्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. येत्या 24 तासांत आंध्र प्रदेश, तेलंगणा, ओडिशा, तसेच नागालँड, मणिपूर आणि मिझोरमसह ईशान्य भारतातील राज्यांमध्येही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. किनारी भागात 100 ते 150 मिमी पाऊस पडू शकतो, त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
महाराष्ट्रावर थेट परिणाम होणार :
या प्रणालीचा थेट परिणाम महाराष्ट्रावर होण्याची शक्यता कमी असली तरी हवामानात किंचित बदल दिसू शकतो. काही भागात ढगाळ वातावरण आणि हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. मात्र, मान्सूनची माघार आता जवळपास पूर्ण झाल्याने पुढील काही दिवसांत तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. (Maharashtra Weather Update)
सध्या पश्चिमी विक्षोभ आणि आर्द्रतेमुळे हवामान पुन्हा सक्रिय झालं असून देशाच्या दक्षिण व पूर्व किनारपट्टीवर याचा प्रभाव सर्वाधिक राहणार आहे. त्यामुळे देशभरातील नागरिकांनी पुढील काही दिवस हवामान विभागाच्या सूचनांवर लक्ष ठेवणं गरजेचं आहे.






