Maharashtra Rain | महाराष्ट्रात सध्या पावसाने कहर केला असून नांदेड जिल्हा त्याचा सर्वाधिक फटका बसलेला भाग ठरला आहे. सलग अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील अनेक भाग पाण्याखाली गेले आहेत. प्रशासनाने आतापर्यंत पाच हजारांहून अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले असून, भारतीय लष्करालाही बचावकार्यासाठी पाचारण करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील गंभीर परिस्थिती :
नांदेड जिल्ह्यातील 93 पैकी तब्बल 69 मंडळांत अतिवृष्टी झाली आहे. विशेषतः कंधार आणि माळाकोळी मंडळात 284 मिमी पावसाची नोंद झाली. जिल्ह्यातील गोदावरी, मानार, मांजरा, लेंडी आणि आसना नद्या तुडुंब भरून वाहत आहेत, त्यामुळे गावागावात पाणी शिरले आहे. जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
पूरस्थितीचा सामना करण्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद दल (SDRF), CRPF, महानगरपालिका व स्थानिक पथकं मैदानात उतरली आहेत. तसेच छत्रपती संभाजीनगरच्या लष्करी बटालियनला तातडीने पाचारण करून बचाव मोहिमेला गती देण्यात आली आहे. बिलोली, मुखेड, कंधार, लोहा, हदगाव, भोकर, देगलूर, किनवट, मुदखेड, हिमायतनगर, धर्माबाद, उमरी, अर्धापूर आणि नायगाव तालुके अतिवृष्टीमुळे सर्वाधिक प्रभावित झाले आहेत.
Maharashtra Rain | जिवीत आणि आर्थिक हानी :
आतापर्यंतच्या माहितीनुसार तिघांचा मृत्यू झाला असून, एक व्यक्ती बेपत्ता आहे. उमरी रेल्वे स्टेशनचे अधीक्षक यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. विष्णुपुरी प्रकल्पाचे दहा दरवाजे, उमरी तालुक्यातील बळेगाव बंधाऱ्याचे 16 दरवाजे आणि लिंबोटी धरणाचे 12 दरवाजे उघडण्यात आले आहेत. 1 लाख 20 क्युसेस पाणी विसर्ग सुरू आहे. यामुळे लाखो हेक्टर शेतीपिकांचे प्रचंड नुकसान झाले असून, अनेक घरं पडली आहेत. जनावरांची मोठ्या प्रमाणात हानी झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
नांदेडमधील परिस्थितीवर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “नांदेडमध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडलेला आहे. वरच्या धरणांमधून अचानक पाण्याचा विसर्ग वाढल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे. लोकांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. परिस्थिती गंभीर असली तरी प्रशासन योग्य प्रकारे हाताळत आहे. लष्कराची मदत घेण्यात आली असून, जिवीतहानी होऊ नये यासाठी सर्व उपाययोजना केल्या जात आहेत.”






