नागरिकांनो सावध राहा! राज्यात मुसळधार पावसाची शक्यता

On: October 25, 2025 1:44 PM
Maharashtra Rain Update
---Advertisement---

Weather Update | राज्यातील नागरिकांनी पुन्हा एकदा छत्री तयार ठेवण्याची गरज आहे. कारण हवामान विभागाने पुढील चार दिवसांसाठी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्यात ढगाळ वातावरण असून ऐन दिवाळीतच पावसाने दडी मारली आहे.

कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, हिंगोली या भागात आधीच मुसळधार पाऊस पडत असल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सप्टेंबरमधील अतिवृष्टी, त्यानंतर परतीचा पाऊस आणि आता पुन्हा अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान वाढले आहे. पावसामुळे काढणीला आलेली पिकं भिजून वाया जाण्याची भीती आहे.

कमी दाबाचे पट्टे आणि चक्रीवादळाची शक्यता :

हवामान तज्ञ मयुरेश प्रभुणे यांनी सांगितले की, मध्यपूर्व अरबी समुद्रावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून ते पुढील तीन ते चार दिवस उत्तर दिशेला सरकणार आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागात मोठा पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचवेळी आग्नेय बंगालच्या उपसागरात तयार झालेलं दुसरं कमी दाबाचं क्षेत्र चक्रीवादळात परिवर्तित होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

हे चक्रीवादळ 27 ऑक्टोबरपर्यंत तयार होऊन वायव्य दिशेला सरकत आंध्र प्रदेश आणि ओडिशा किनारपट्टीच्या दिशेने जाईल, असा अंदाज आहे. या दोन कमी दाबाच्या प्रणालींमुळे महाराष्ट्रात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक भागांत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. नोव्हेंबरच्या सुरुवातीला हवामान कोरडं होण्याची शक्यता आहे.

Weather Update | चार दिवसांचा पावसाचा अलर्ट – कुठे जास्त धोका? :

हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, 25 ते 28 ऑक्टोबरदरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. 25 ऑक्टोबरला नांदेड, हिंगोली, कोल्हापूर वगळता सर्व जिल्ह्यांना अलर्ट आहे. 26 ऑक्टोबरला मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, पुणे, नगर, विदर्भातील जिल्ह्यांना मुसळधार पावसाची शक्यता आहे.

27 ऑक्टोबरला रायगड, पुणे, अहिल्यानगर, बीड, बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपूर, यवतमाळ आणि गडचिरोली या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर 28 ऑक्टोबरला सिंधुदुर्ग, कोल्हापूर, नांदेड, नागपूर, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

तळकोकणात पावसाची रिपरिप सुरू

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या हलक्या पावसाची रिपरिप सुरू आहे. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यांमुळे मच्छीमारी ठप्प झाली असून, अनेक बोटी देवगड बंदरात थांबल्या आहेत. 28 ऑक्टोबरपर्यंत जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू राहणार असल्याचा अंदाज आहे.

भात कापणीवर परिणाम झाल्याने शेतकरी चिंतेत आहेत. काही ठिकाणी कापलेला भात भिजल्यामुळे नुकसान होत आहे. हवामान विभागाने शेतकऱ्यांना आणि नागरिकांना पुढील चार दिवस सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

News Title: Heavy Rain Alert in Maharashtra: IMD Warns of Cyclone and Low Pressure Zones for Next Four Days

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now